महिला विश्वचषक २०२५(फोटो-सोशल मीडिया)
ICC Women’s World Cup 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून भारत आणि श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी महिला विश्वचषकासाठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. यावेळी आयसीसीकडून महिला विश्वचषक २०२५ साठीची बक्षीस रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. यासह, महिला विश्वचषकाची बक्षीस रक्कम आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या बक्षीस रकमेपेक्षा खूपच जास्त करण्यात आली आहे. २०२३ च्या विश्वचषकात एकूण बक्षीस रक्कम १० दशलक्ष डॉलर्स इतकी देण्यात आली होती.
आयसीसीने बक्षीस रक्कम वाढवताना म्हटले आहे की, २०२५ च्या महिला विश्वचषकात एकूण बक्षीस रक्कम १३.८८ दशलक्ष डॉलर्स (अमेरिकन डॉलर्स) असणार आहे. ही रक्कम या वर्षाच्या सुरुवातीला पहिले आयपीएल जेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकलेल्या बक्षीस रकमेच्या दुप्पट असणार आहे. आयपीएलमध्ये विजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. त्याच वेळी, महिला विश्वचषकातील विजेत्या संघाला ४० कोटी रुपये बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आहे.
हेही वाचा : T20 आशिया कपमध्ये कोण आहे सर्वोत्तम सरासरीचा किंग! जाणून घ्या ‘या’ 6 फलंदाजांची आकडेवारी
१३ व्या महिला क्रिकेट विश्वचषकात विजेता ठरणाऱ्या संघाला ४.४८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ३९,५४,००,२९४ रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाला देण्यात आलेल्या १.३२ दशलक्ष डॉलर्सच्या बक्षीस रकमेपेक्षा ही रक्कम २३९ टक्के जास्त करण्यात आली आहे. तर उपविजेत्या संघाला २.२४ दशलक्ष डॉलर्स (१९,७७,११,३१४ रुपये) देण्यात येणार आहेत. तसेच उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांना १.१२ दशलक्ष डॉलर्स (९,८८,५७,९२६ रुपये) मिळणर आहेत.
गट टप्प्यातील प्रत्येक सहभागी असणाऱ्या संघाला २५०,००० डॉलर्स (२,२०,६६,५०१ रुपये) मिळतील. तर गट टप्प्यातील प्रत्येक विजेत्याला $34,314 (रु. 30,28,794)मिळणार आहेत. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर राहिलेल्या संघांना $700,000 (रु. 6,17,86,900) देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेत सातव्या आणि आठव्या स्थानावर राहणाऱ्या संघांना $280,000 (रु. 2,47,14,765) मिळतील असे जाहीर करण्यात आले आहे.
आयसीसी अध्यक्ष जय शाह बक्षीसाची रक्कम जाहीर केली तेव्हा म्हणाले की, “बक्षीस रकमेतील ही वाढ ‘महिला क्रिकेटच्या प्रवासात एक निर्णायक मैलाचा दगड’ ठरणार आहे. बक्षीस रकमेतील ही चार पट वाढ महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण असून हे दाखवून देत आहे की, आम्ही त्याच्या दीर्घकालीन विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. तसेच आमचा स्पष्ट संदेश असा देखील आहे की, जर एखाद्या महिलेने व्यावसायिकपणे क्रिकेट निवडले तर तिला पुरुषांइतकाच आदर आणि सुविधा देण्यात येतील.”
हेही वाचा : ‘त्याचा काही स्वार्थी हेतू असेल…’, ‘त्या’ व्हिडीओनंतर हरभजन सिंगने ललित मोदींवर साधला निशाणा