आज यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स आमनेसामने(फोटो-सोशल मीडिया)
UP Warriors and Gujarat Giants face off! महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला कालपासून(शुक्रवार) सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात या हंगामातील पहिला सामना खेळला गेला आहे. या सामन्यात स्मृती मानधनाच्या आरसीबी संघाने मुंबईचा ३ विकेट्सने पराभव करून विजयी सुरुवात केली. महिला प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात शनिवारी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स आमनेसामने येणार असून, दोन्ही संघांची नजर स्पर्धेत सुरुवातीपासूनच लय मिळवण्यावर असेल. मागील हंगामांत संमिश्र कामगिरी झाल्यानंतर यंदा पहिल्या विजेतेपदाच्या दिशेने दमदार वाटचाल करण्याचा दोन्ही संघांचा निर्धार आहे. यूपी वॉरियर्ससाठी हा हंगाम नव्या सुरुवातीचा मानला जात आहे.
हेही वाचा : IND vs NZ Live Telecast : पहिला एकदिवसीय सामना किती वाजता सुरू होईल? कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming
अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज मेग लॅनिंगकडे यंदा संघाची धुरा देण्यात आली आहे. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा वॉरियर्सला होण्याची अपेक्षा आहे. मागील काही हंगामांत संघाची कामगिरी घसरत गेली असून, ही घसरण थांबवण्याचे मोठे आव्हान संघासमोर आहे. फलंदाजीमध्ये फोबे लिचफिल्ड आणि किरण नवगिरे सलामीला स्थिरता देऊ शकतात, तर मधल्या फळीत लॅनिंग आणि हरलीन देओल यांच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा असेल. मात्र विकेटकीपिंग विभागात शिप्रा गिरी हाच एकमेव तज्ज्ञ पर्याय असल्याने संघरचनेबाबत काही प्रश्न कायम आहेत.
गोलंदाजीमध्ये सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, शिखा पांडे आणि क्रांती गौड यांचा अनुभव वॉरियर्सची मोठी ताकद ठरू शकतो. दुसरीकडे, गुजरात जायंट्स मागील हंगामात प्ले-ऑफमध्ये पोहोचल्याने आत्मविश्वासात आहेत. कर्णधार एशले गार्डनरच्या नेतृत्वाखाली संघात परदेशी खेळाडूंचा मजबूत गाभा आहे. बेथ मूनी विकेटमागे आणि वरच्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावतील, तर सोफी डिवाइन डब्ल्यूपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. रेणुका सिंग ठाकूरच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजी आणि गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, राजेश्वरी गायकवाड यांसारख्या फिरकीपटूंचे पर्याय जायंट्सला संतुलित बनवतात. दोन्ही संघ बदलाच्या टप्प्यातून जात असल्याने, हा पहिला सामना त्यांच्या संपूर्ण मोहिमेची दिशा ठरवणारा ठरू शकतो.
यूपी वॉरियर्स : मेग लॅनिंग (कर्णधार), श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, फोबी लिचफील्ड, किरण नवगिरे, हरलीन देओल, क्रांती गौड, आशा शोबाना, शिखा पांडे,डिआंड्रा डॉटिन, शिप्रा गिरी, सिमरन शेख, चालीं नॉट, क्लो मीन ट्रायॉन, सुवल, त्रिमान, रावल.
गुजरात जायंट्स : अॅशलेह गार्डनर (कर्णधार), बेथ मूनी, रेणुका सिंग ठाकूर, सोफी डिव्हाईन, भारती फुलमाली, तितास साधू, काश्वी गौतम, कनिका आहुजा, तनुजा कंवर, जॉर्जिया वेरेहम, अनुष्का शर्मा, हॅप्पी कुमारी, किम गर्थ, शिवानी सिंग, दानी व्याट-हो, सोफी राजेवा, गौतम, डेंनी वायट-हो.






