प्रतिका रावल आणि स्मृती मानधना(फोटो-सोशल मिडीया)
Ind w vs Eng w : भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० मध्ये इंग्लंडला धूळ चारल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आता एकदिवसीय मालिकेतही तोच कित्ता गिरवायला सुरवात केली आहे. इंग्लड आणि भारत यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना साउथहॅम्प्टन येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या विजयाने भारतीय संघाची एकदिवसीय मालिकेची सुरुवात चांगली झाली आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासोबतच टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला आहे. ही कामगिरी टीम इंडियाची सलामी जोडी स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी करून दाखवली आहे.
हेही वाचा : IND vs ENG : महिला क्रिकेटची ऋषभ पंत! एका हाताने मारला गगनचुंबी षटकार, गोलंदाजही थक्क
टीम इंडियाची सलामी जोडी स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी संघाला इंग्लंडविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाला पहिला धक्का स्मृती मानधनाच्या स्वरूपात मिळाला. मानधना २८ धावा करून बाद झाली. यासह, टीम इंडियाच्या सलामी जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीने १००० धावा पूर्ण करून जगातील पहिली सलामीवीर जोडी बनली आहे.
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या दोघांनीही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८४.६ च्या सरासरीने १००० धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रतिका रावलने ३६ धावा काढल्या. यापूर्वी महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीने १००० धावा पूर्ण करण्याची कामगिरी इंग्लंडच्या कॅरोलिन अॅटकिन्स आणि सारा टेलर या जोडीच्या नावावर होती.
टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिने ६४ चेंडूंत ६२ धावा केल्या. दीप्ती शर्माला तिच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसरीकडे, दीप्ती शर्मा या सामन्यात चेंडूने आपली कमाल दाखवू शकली नाही. तिने १० षटकांत ५८ धावा दिल्या. या दरम्यान तिला एकही विकेट काढता आली नाही. त्यांच्याशिवाय जेमिमाने ४८, प्रतिका रावलने ३६, मानधना २८, हरलीन देओलने २७ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने १७ धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने ४८.२ ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून हा सामना आपल्या नावावर केल्या.
हेही वाचा : Sir Jadeja कडून ICC Ranking मध्ये पहिले स्थान हिसकावणं म्हणजेच…! हा पराक्रम करणारा जगातील चौथा अष्टपैलू
इंग्लंड संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट गमावून २५८ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून सोफिया डंकलीने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. याशिवाय डेव्हिडसन रिचर्ड्सने ५३ धावा केल्या. याशिवाय कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटने ४१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. परंतु इंग्लड आपल्या धावांचा बचाव करू शकले नाहीत.