
गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन (Sai Sudharsan) सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीवर आहे. त्याने १३ सामन्यांमध्ये ६३८ धावा केल्या आहेत. गुजरातचा कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) देखील जोरदार फॉर्ममध्ये आहे. शुबमनने १३ सामन्यांमध्ये ६१६ धावा केल्या आहेत. दोघांनी मिळून अनेक विक्रम मोडले असून गुजरातच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा हेनरिच क्लासेन यानेही तुफानी फलंदाजी करत १४ सामन्यांमध्ये ६०६ धावा केल्या आहेत. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) हा देखील या स्पर्धेत सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. १४ सामन्यांत ५८३ धावा करत त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. याशिवाय ईशान किशन ५६९ धावा, अभिषेक शर्मा ६६३ धावा आणि विराट कोहली (Virat Kohli) ५५७ धावांसह शर्यतीत कायम आहेत. विराट कोहलीने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडत पुन्हा एकदा आपल्या अनुभवाची झलक दाखवली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सध्या पर्पल कॅपच्या यादीमध्ये आघाडीवर आहे. त्याने १४ सामन्यांत २४ विकेट घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण केले आहे. गुजरात टायटन्सचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) देखील या शर्यतीत जोरदार आव्हान देत आहे. रबाडानेही २४ विकेट घेत भुवनेश्वरच्या बरोबरीत स्थान मिळवले आहे. प्लेऑफमध्ये कोणता गोलंदाज अधिक प्रभाव टाकतो यावर पर्पल कॅपचे भवितव्य ठरणार आहे. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) देखील या शर्यतीत कायम आहे. त्याच्या खात्यात २१ विकेट असून मोठ्या सामन्यांमध्ये तो सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे प्लेऑफमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीची लढत आता आणखी रोमांचक बनली आहे. विशेष म्हणजे, या हंगामात युवा खेळाडूंनी अनुभवी स्टार्सना कांटे की टक्कर दिली आहे. त्यामुळे IPL 2026 च्या अखेरीस कोण ऑरेंज कॅप आणि कोण पर्पल कॅप जिंकणार याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.