किदाम्बी श्रीकांत(फोटो-सोशल मिडिया)
Malaysia Masters Tournament : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हला हरवून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. क्वार्टरफायनलमध्ये ६५ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतची जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असणाऱ्या पोपोव्ह यांच्यात रोमांचक लढत झाली आहे. या लढतीत श्रीकांतने पोपोव्हचा एक तास १४ मिनिटांत २४-२२, १७-२१, २२-२० असा पराभव केला.
श्रीकांतचा उपांत्य फेरीत सामना जपानच्या युशी तनाकाशी होणार आहे. जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या भारतीय संघासाठी गेल्या एका वर्षामधील हा पहिलाच उपांत्य सामना असणार आहे. शनिवारी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तनाकाने टोमा ज्युनियरचा भाऊ क्रिस्टो पोपोव्हचा २१-१८, १६-२१, २१-६ असा पराभव केला. पुरुष एकेरीचा दुसरा उपांत्य सामना जपानचा चौथा मानांकित कोडाई नारोका आणि चीनचा दुसरा मानांकित ली शी फेंग यांच्यात खेळवला जाणार आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा पराभव झाला. त्यानंतर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेत श्रीकांत हा एकमेव भारतीय बाकी आहे. कपिला आणि क्रॅस्टो यांनी पहिल्या गेममध्ये जियांग झेन बँग आणि वेई या जिन या अव्वल मानांकित चिनी जोडीला जोरदार लढत दिल्याचे दिसले. परंतु त्यांनी आपला वेग गमावला आणि तिथेच खेळ बिघडला. परिणामी ३५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात २२-२४, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
३२ वर्षीय श्रीकांतने गेल्या काही हंगामांपासून फॉर्म आणि फिटनेसशी संघर्ष करत आहे. पात्रता फेरीत त्याला मोठा संघर्ष करावा लागला असला तरी, त्याने आता सलग पाच विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. श्रीकांत प्रतिक्रिया दिली की, एका स्पर्धेत मी इतके सामने जिंकल्यापासून बराच काळ गेला आहे, मला आशा आहे की मी पुढे असेच करत राहीन.
तो पुढे म्हणाला की, मी नेहमीच स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. २०२२ मध्ये भारताच्या ऐतिहासिक थॉमस कप विजयात सहभागी असलेल्या श्रीकांतला याआधी २०२१ च्या ऑर्लीन्स मास्टर्स आणि २०२३ च्या फ्रेंच ओपनमध्ये टोमाकडून दोनदा पराभव स्वीकारावा लागला होता. पण यावेळी मात्र बाजी पलटवली आहे आणि ७४ मिनिटांत विजय मिळवला.