सौजन्य - Krishan B Pathak इंस्टाग्राम
Krishan Sreejesh Became a Goalkeeper of Team India : पीआर श्रीजेशच्या निवृत्तीनंतर, आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील 18 सदस्यीय भारतीय हॉकी संघाचा मुख्य गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठकला बनवण्यात आले आहे. भारताव्यतिरिक्त कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि यजमान चीन या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 8 ते 17 सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकल्यानंतर श्रीजेशने हॉकीला अलविदा केला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टँडबाय गोलकीपर असलेला पाठक आता मुख्य गोलकीपर असेल तर सूरज करकेरा राखीव गोलकीपर असेल.
विवेक सागर प्रसाद बनला उपकर्णधार
अनुभवी मिडफिल्डर विवेक सागर प्रसादला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. नियमित उपकर्णधार हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंत सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारताच्या नवोदित ड्रॅग-फ्लिकर जुगराज सिंग ज्युनिअरसाठीही ही सुवर्णसंधी असेल. प्रो लीगमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे. अरिजितसिंग हुंदल हा संघातील तिसरा ड्रॅग फ्लिकर असेल. बचावाची जबाबदारी जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय आणि सुमित यांच्यावर असेल. मिडफिल्डमध्ये राजकुमार पाल, नीलकांत शर्मा, मनप्रीत सिंग आणि मोहम्मद राहिल असतील. फॉरवर्ड लाइनमध्ये अभिषेक, सुखजित सिंग, हुंडल, ज्युनियर संघाचा कर्णधार उत्तम सिंग आणि गुरज्योत सिंग यांचा समावेश असेल.
ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्यानंतरची पहिली परीक्षा
पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या संघातील दहा सदस्य या संघात आहेत. हॉकी इंडियाने जारी केलेल्या निवेदनात प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, ‘ही आमच्यासाठी महत्त्वाची स्पर्धा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून आनंदोत्सव साजरा करून संघ कॅम्पमध्ये परतला आहे. संघाला प्रचंड प्रेम मिळाल्याने गेले काही आठवडे छान गेले. भविष्यातही हा पाठींबा कायम राहील अशी आशा आहे. नवीन ऑलिम्पिक सायकल आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीने सुरू होत असून आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत.
भारतीय हॉकी संघ
हा आहे भारतीय संघ, गोलरक्षक: कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा, बचावपटू: जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, जुगराज सिंग, संजय आणि सुमित, मिडफिल्डर: राजकुमार पाल, नीलकांत शर्मा, विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग आणि मोहम्मद राहिल , फॉरवर्ड: अभिषेक, सुखजित सिंग, अरिजित सिंग हुंदल, ज्युनियर संघाचा कर्णधार उत्तम सिंग आणि गुरजोत सिंग मुख्य प्रशिक्षक: क्रेग फुल्टन