भारत पाक येणार आमनेसामने (फोटो- सोशल मिडिया)
भारतात आयोजित होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरच्या मैदानावर आणि स्थानिक चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर भारतीय संघ पाकिस्तानवर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल, पाकिस्तानला हॉकीच्या मैदानात देखील पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
आगामी मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 दरम्यान पंजाबमध्ये केले जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हॉकी इंडियाच्या उपस्थितीत याची घोषणा केली आहे. पंजाबमधील प्रमुख दोन शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’
‘मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026’ या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या आयोजनासाठी पंजाब पूर्णपणे सज्ज झाले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचे सर्व सामने पंजाबमधील जालंधर आणि मोहाली या दोन ऐतिहासिक शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हॉकी इंडिया आणि पंजाब सरकारने या स्पर्धेच्या टप्प्यांचे आणि मैदानांचे नियोजन अधिकृतपणे स्पष्ट केले आहे.
स्पर्धेची सुरुवात जालंधर येथील प्रसिद्ध ‘ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियम’मधून होणार असून, नॉकआउट टप्प्यातील अंतिम थरार मोहाली येथील ‘ऑलिम्पियन बलबीर सिंग सीनियर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियम’वर रंगणार आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी जालंधरच्या ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 दरम्यान सर्व सहभागी सहा संघांचे (भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपान) साखळी सामने याच मैदानावर खेळवले जाणार आहेत.






