पाकिस्तानमध्ये श्रीलंकन संघाच्या सुरक्षेत वाढ(फोटो-सोशल मीडिया)
Security beefed up for Sri Lankan team in Pakistan : पाकिस्तानमध्ये अलिकडेच दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर, श्रीलंका क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आणि नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले मोहसीन नक्वी यांनी श्रीलंकेच्या संघाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ला त्यांच्या भूमीचा वापर करण्याची मुभा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा : IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज
आत्मघातकी हल्ल्यात १२ जणांचा बळी
मंगळवारी, इस्लामाबादमधील न्यायालयीन संकुलाबाहेर एका आत्मघातकी हल्लेखोराकडून स्वतःला उडवून देण्यात आले. ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, उत्तर पाकिस्तानच्या वाना भागातील वाना कॅडेट कॉलेजवर झालेला दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि सुमारे ३०० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. पाकिस्तानचे माहिती मंत्री अता तरार यांनी सांगितले की, जर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई केली नसती तर पाकिस्तानमध्ये २०१८ मध्ये पेशावर शाळेतील हल्ल्यासारखी मोठी घटना घडू शकली असती.
तीन वर्षांपूर्वी न्यूझीलंड संघाकडून पाकिस्तानविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका रद्द करण्यात आली होती. संभाव्य दहशतवादी हल्ल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर न्यूझीलंड संघ कोणताही सामना न खेळता मायदेशी परतला होता. यामुळेच मोहसिन नकवी यांनी वैयक्तिकरित्या स्टेडियमला भेट दिली आणि पाहुण्या संघाच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या सुरक्षेची खात्री दिली असे सूत्रांनी सांगितले की मार्च २००९ मध्ये, टीटीपीच्या दहशतवाद्यांकडून गद्दाफी स्टेडियमजवळ श्रीलंकेच्या संघाच्या बसवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी संघांनी देशाचा दौरा करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जवळजवळ १० वर्षे थांबलेले होते.
सूत्राने सांगितले की, “श्रीलंकेच्या संघाची सुरक्षा वाढवली गेली आहे आणि पाहुण्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी रेंजर्स देखील तैनात करण्यात आले आहेत.” रावळपिंडीमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळल्यानंतर, श्रीलंका १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी-२० तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. ज्यामध्ये झिम्बाब्वे तिसरा संघ असणार आहे.






