पाकिस्तान महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
PCB’s big blow to Pakistan women’s team : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कामगिरी सुमार राहिली आहे. पाकिस्तानी महिला संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आतापर्यंत एक देखील सामना जिंकू शकला नाही. त्यामुळे या संघाच्या कामगिरीबद्दल आता प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानला १५० धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले. २४ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. या सामन्यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नक्वी यांनी संघ व्यवस्थापन आणि रणनीतींची चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत, ज्यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे, असे बोलले जाते आहे. फिरकी परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणाऱ्या पाकिस्तान संघाला अपेक्षा पूर्ण न करता हा निर्णय घेतला गेला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या महिला विंगच्या प्रमुख पदी राफिया हैदर असून त्या लाहोरच्या माजी उपायुक्त आहेत.
पाकिस्तान संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामने खेळलेले आहेत, त्यापैकी चार सामन्यात पाकिस्तान संघाने पराभव पत्करला आहे. तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला बांगलादेशने सात विकेट्सने पराभव केला, तर भारताकडून त्यांना ८८ धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यानंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून १०७ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडविरुद्धचा सामना पावसाने वाया घालवला, परंतु पाकिस्तानला हा सामना जिंकण्याची दाट शक्यता होती. इंग्लंडनंतर, न्यूझीलंडविरुद्धचा सामना देखील पावसामुळे रद्द झाला आणि दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला धूळ चारली होती आणि पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले.
पाकिस्तानच्या माजी कर्णधार जावेरिया खानने देखील संघाच्या फलंदाजीवर जोरदार निशाणा साधताना म्हटले की, “फलंदाज आपली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत, परंतु गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंडला कठीण परिस्थितीत अडकवले होते परंतु, ते काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरले नाहीत. मला वाटते की पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे खेळाडूंचा आत्मविश्वासामध्ये कमी आली.”






