आसिफ आफ्रिदी(फोटो-सोशल मीडिया)
Asif Afridi creates history on Test debut : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे दूसरा कसोटी सामना सुरू आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक इतिहास रचला आहे. रावळपिंडी येथे अनुभवी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज आसिफ आफ्रिदीने त्याच्या कसोटी पदार्पणातच शानदार कामगिरी केली आहे. या सामन्यात आफ्रिदीने पाच विकेट्स घेऊन 92 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 38 वर्षे आणि 301 दिवसांच्या वयात, आफ्रिदीने कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा जगातील सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम इंग्लंडच्या चार्ल्स मॅरियटच्या नावावर जमा होता, ज्याने 1933 मध्ये 37 वर्षे आणि 332 दिवसांच्या वयात पदार्पणात पाच विकेट्स काढल्या होत्या.
हेही वाचा : ICC Ranking : ‘यॉर्कर किंग’ बुमराह कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल! सिराजची ODI सामन्यांमध्ये मोठी झेप
आसिफ आफ्रिदीने पाकिस्तानी स्थानिक क्रिकेटमध्ये बराच कालावधी शानदार कामगिरी केली, परंतु राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. अखेर, जेव्हा त्याला रावळपिंडी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळाली तेव्हा आफ्रिदीने या संधीचे सोने केले आणि त्याने कसोटी क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
आफ्रिदीच्या फिरकी आणि विविधतेने संथ असणाऱ्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. त्याने दुसऱ्या दिवशी दोन आणि तिसऱ्या दिवशी आणखी तीन महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानला या सामन्यावर मजबूत पकड मिळवण्यास मदत झाली आणि आफ्रिदीने त्याचे कसोटी पदार्पण खळबळ उडवून केले.
या कामगिरीसह, आफ्रिदीने कसोटी क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणाऱ्या सर्वात वयस्कर पाकिस्तानी गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. पहिल्या क्रमांकावर नोमान अली विराजमान आहे, ज्याने ३९ वर्षे ५ दिवस वय असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाहोर कसोटीच्या पहिल्या डावात ११२ धावा देऊन ६ विकेट्स चटकावल्या होत्या. तसेच, मोहम्मद नझीरने १९८३ मध्ये वयाच्या ३७ वर्षे आणि २११ दिवसांत ही कामगिरी करून दाखवली होती.
हेही वाचा : भारतीय संघात धर्म महत्वाचा? सरफराज खानचे नाव घेत मुस्लिम नेत्यांचा प्रशिक्षक गंभीरवर हल्लाबोल
आसिफ आफ्रिदीने केलेली ही कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड नाही, तर पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणून देखील त्याकडे बघितले जाणार आहे.