
photo- social media
आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यापूर्वी बंगळुरु पोलिसांनी एक सूचना जारी करत स्पष्ट केले आहे की, सामन्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून जल्लोष करू नये. रोड शो, बाईक रॅली, स्टंटबाजी, ओव्हरस्पीडिंग आणि रस्ते अडवणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच. कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुका, किंवा मोठ्या जमावाला परवानगी दिली जाणार नाही. विशेषतः एम.जी. रोड, चर्च स्ट्रीट, ब्रिगेड रोड आणि प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून सामन्याचे प्रक्षेपण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असेल. आधीपासून बसवलेल्या एलईडी वॉलवरही थेट सामना दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. सामन्यानंतर कोणत्याही प्रकारची गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे, भांडणे करणे किंवा अशोभनीय वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच फटाके फोडण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरसीबीने यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र पोलिस प्रशासनाने चाहत्यांना नियमांचे पालन करत आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती पसरू नये यासाठी पोलिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लक्ष ठेवून आहेत. सामन्यादरम्यान आणि त्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, अफवा किंवा भडकावू संदेश टाकू नयेत, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे. शहरात शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम