रोहित शर्मा(फोटो-सोशल मिडिया)
Rohit Sharma Birthday Special : भारतीय संघाचा कर्णधार ज्याला ‘हिटमॅन’ म्हणून ओळखले जाते अशा रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. ३० एप्रिल २०२५ रोजी रोहित शर्मा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शर्माचा जन्म १९८७ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर या शहरात झाला आहे. भारतीय संघात खेळताना आणि कर्णधारपद भूषवताना रोहितने अनेक मोठे विक्रम केले आहे. धोनीनंतर यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव घेतले जाते. धोनीनंतर टी-२० आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो पहिला कर्णधारही बनला आहे. रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे ज्याला सर्वोत्तम गोलंदाज देखील घाबरून राहतात. आज त्याच्याच बाबत आपण जाणून घेणार आहोत.
रोहित शर्मा हा जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात ३ द्विशतके जमा आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम देखील रोहितच्या नावावर नोंदवला गेला आहे. तो भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर त्याने -२० मधून् निवृत्ती घेतली आहे.
रोहित शर्माने २००७ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर रोहित शर्माने आयपीएलमध्ये आपला दबदबा कायम राखला. त्याची आयपीएल कारकीर्दही खूपच बहारदार राहिली आहे. रोहित शर्माने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून पहिल्या आयपीएल हंगामात पदार्पण केले होते, त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये गेला आणि जिथे त्याने संघाचे नेतृत्व करणे स्वीकारले आणि संघाला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. शर्माच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावले आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तपणे सर्वात यशस्वी संघ बनला आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीही तो त्याच्या संघासाठी स्फोटक खेळी खेळताना दिसून येत आहे.
रोहित शर्माने धावांच्या बाबत अनेक विक्रम मोडीत काढले आणि अनेक विक्रम रचले आहेत. पण त्याला प्रथम गोलंदाज बनायचे होते. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही एक ऑफ-स्पिनर म्हणून केली होती. आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाजही ठरला आहे.
रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतके करणारा एकमेव खेळाडू आहे. रोहितने २०१३ मध्ये बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्ध त्याने २६४ धावांचा विश्वविक्रम केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा २०१७ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध २०८ धावांची नाबाद खेळी साकारली होती.
रोहितने टी-२० मध्ये पाच शतके झळकावली आहेत आणि या फॉरमॅटमध्ये पाच शतके झळकावणारा सदया तो एकमेव खेळाडू आहे. रोहितने २०१५ मध्ये धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०६ धावा काढल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने ११८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर, त्याने २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद १०० धावा आणि त्याच वर्षी पुन्हा एकदा लखनौमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १११ धावा केल्या होत्या.
रोहित शर्माने विश्वचषकात एक असा विक्रम केला आहे जो मोडणे खूप कठीण मानले जात आहे. रोहित हा एकाच एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकवणारा खेळाडू आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात हिटमनने ५ शतके केली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १२२, इंग्लंडविरुद्ध १०२, पाकिस्तानविरुद्ध १४०, श्रीलंकेविरुद्ध १०३ आणि बांगलादेशविरुद्ध १०४ धावा केल्या.
रोहित शर्माने आतापर्यंत २७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने १११६८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ३२ शतके देखील झळकावली आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने १५९ सामन्यांमध्ये ४२३१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ५ शतके झळकावली आहेत. त्याच्या कसोटी क्रिकेटबद्दलच्या कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्याने ६७ सामन्यांच्या ११६ डावात ४३०१ धावा केल्या. या काळात त्याने १२ शतके देखील लगावले आहेत.