Gautam Gambhir AND BCCI Selectors Meeting Regarding SL Tour : राष्ट्रीय निवड समिती आणि गौतम गंभीर यांच्यात तासभराची आभासी बैठक झाली, ज्यामध्ये टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाने आपले ध्येय समोर ठेवले. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी संघाबाबत बैठकीत चर्चा झाली, ज्यात अजित आगरकर यांच्या निवड समितीचे सदस्य, गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा समावेश होता.
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघ जुलै अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ नवा असणार आहे.
मोठी अपडेट, रोहित राहणार उपलब्ध
तर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची पहिली परिक्षा असणार आहे. याबरोबरच आतापर्यंत श्रीलंका दौऱ्याबाबत बातम्या येत होत्या की कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते, परंतु आता रोहित शर्माच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाला मिळणार केएल राहुलची साथ
अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंना संधी मिळू शकते, ज्यांची टी-20 विश्वचषकासाठी संघात निवड झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण या मालिकेसाठी तो स्वत:ला उपलब्ध करून देऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
वनडे मालिकेतील निवडीसाठी उपकर्णधार हार्दिक पंड्या अनुपलब्ध असल्याने या मालिकेत संघाचे नेतृत्व करण्यासाठी केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांची निवड होऊ शकते. पांड्याचा फिटनेस लक्षात घेऊन त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याबाबत सस्पेंस आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पांढऱ्या चेंडूच्या मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार असून, त्यामध्ये तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.