मुंबई : ‘विक्रमांचा बादशाह’, ‘फुटबॉलचा जादूगार’ अशा अनेक नावांनी संबोधला जाणारा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने रविवारी आपल्या अर्जेंटिना संघाला फुटबॉलचा विश्वविजेता बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. मेस्सीमुळे तब्ब्ल ३६ वर्षानंतर अर्जेंटिनाने फिफा फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विश्वचषकासह मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावून इतिहास रचला. फुटबॉल जगतावर आपल्या खेळीने ठसा उमटवणाऱ्या लिओनेल मेस्सीची कारकीर्द ही खरोखरच नेत्रदीपक आहे, त्याच्या कारकिर्दीवर टाकुयात एक नजर
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला मेस्सी :
२४ जून १९८७ रोजी अर्जेंटीनातील रोझारियो येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात लिओनेल आंद्रेस मेस्सी म्हणजे लिओनेल मेस्सी याचा जन्म झाला. लिओनेल मेस्सीचे वडील एका कारखान्यात काम करत असत. तर आई क्लिनर म्हणून काम करत होती. मात्र, त्याचे वडील एका क्लब मध्ये प्रशिक्षक म्हणूनही नोकरी करीत असल्याने त्याच्या घरात करीत देखील फुटबॉलचे वातावरण होते. अशा परिस्थितीत लिओनेल मेस्सी स्वतः वयाच्या ५ व्या वर्षी एका क्लबमध्ये सहभागी झाला. तेथे तो या खेळाच्या मूलभूत गोष्टी शिकला. पुढे वयाच्या ८ व्या वर्षी मेस्सीने आपला क्लब बदलला आणि तो नेवेल ओल्ड बॉईज क्लबमध्ये गेला. पण काही काळाने अशी घटना घडली, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मेस्सीला लहानपणीच जडला होता ‘हा’ गंभीर आजार :
वयाच्या ११ व्या वर्षी लिओनेल मेस्सीला ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी नावाचा आजार जडला. या आजारात कोणत्याही व्यक्तीची प्रगती थांबते. त्याचा हा आजार वाढत गेला असता तर त्याची वयाच्या ११ व्या वर्षी जेवढी उंची होती ती तेवढीच राहिली असती. हा आजार झालेला असताना मेस्सीच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. याच दरम्यान मेस्सीचे नशीब बदलले. फुटबॉल क्लब बार्सिलोना त्यावेळी खेळाडू म्हणून लहान मुलांवर लक्ष ठेवून होते. टॅलेंट हंट अंतर्गत, लहान शहरे, शाळा, महाविद्यालये आणि विविध क्लबमध्ये हे केले जात होते. बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्लेस रझाक यांना लिओनेल मेस्सीबद्दल माहिती मिळाली. क्लबने मेस्सीला साइन केले. यासोबतच औषधांचा आणि आजारावरील उपचारांचा संपूर्ण खर्च देण्यास क्लब तयार झाला. अट एवढीच होती की मेस्सीला अर्जेंटिना सोडून बार्सिलोनाला जावे लागेल. कुटुंबाने हे मान्य केले आणि अशा प्रकारे लिओनेल मेस्सीची व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द सुरू झाली.
सन २००४-५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी लिओनेल मेस्सीने बार्सिलोना क्लबमध्ये पदार्पण केले. बार्सिलोनाकडून फुटबॉल खेळणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. लिओनेल मेस्सीने १ मे २००५ रोजी वरिष्ठ संघासाठी पहिला गोल केला.तसेच लिओनेल मेस्सीने २४ जून रोजी एक वरिष् खेळाडू म्हणून बार्सिलोनासोबत करार केला. तो जवळपास दोन दशके या क्लबकडून खेळला. या दरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने बार्सिलोनाकडून एकूण 672 गोल केले आहेत. त्याने या क्लबकडून खेळताना युइएफए चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यांत 28 गोल केले आहेत.
विक्रमांचा बादशाह ‘मेस्सी’ :
मेस्सीने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेतली होती, मात्र तो परत संघात परतला. त्याने संघाला 2018च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्यास महत्वाची भुमिका बजावली. त्याचबरोबर त्याने 2021मध्ये कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. ज्यामध्ये तो गोल्डन बॉल आणि गोल्डन शूजचा मानकरी ठरला.
क्लब आणि देशासाठी एका वर्षात सर्वाधिक गोल (91 गोल 2012मध्ये) करण्याचा विक्रम गिनिस वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये मेस्सीने आपल्या नावावर केला आहे. एक वर्षात देशासाठी सर्वाधिक गोल्स (12) चा विक्रम पण त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याने अर्जेंटिनाकडून आतापर्यंत सर्वाधिक असे 171 सामने खेळताना सर्वाधिक 96 गोल केले आहेत. याबरोबर तो आजच्या घडीला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये मेस्सी तिसऱ्या स्थानावर आहे.
मेस्सीचे चॅम्पियन्स लीग रेकॉर्ड :
सर्वाधिक चॅम्पियन्स लीग ग्रुप स्टेज गोल: 80 (बार्सिलोनासाठी 71)
सर्वाधिक चॅम्पियन्स लीग फेरीतील १६ गोल: २९
एका क्लबसाठी सर्वाधिक चॅम्पियन्स लीग गोल: 120 (बार्सिलोना)
चॅम्पियन्स लीगमधील सर्वाधिक सलग सीझन स्कोअरिंग: 18
मेस्सीचे लीगा रेकॉर्ड :
सर्वाधिक लिगा गोल: 474
एका हंगामात सर्वाधिक लीगा गोल: 50 (2011/12)
सर्वाधिक लिगा हॅट्ट्रिक्स: ३६
परदेशी खेळाडूंनी जिंकलेली सर्वाधिक लीगा खिताब: 10
मेस्सीचा वैयक्तिक सन्मान :
सर्वाधिक बॅलन डी’ओर पुरस्कार: 7
सर्वाधिक ESM गोल्डन शूज: 6