फोटो सौजन्य - Social Media
मुंबईतील क्रीडा रसिकांसाठी आनंदाची बातमी! बहुप्रतिक्षित प्रो गोविंदा लीग २०२५ येत्या ७ ऑगस्टपासून वरळी येथील एनएससीआय डोम येथे रंगणार आहे. ग्लोबल व्हेंचर्स अंतर्गत कार्यरत अस्पेक्ट स्पोर्ट्स या संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदा विशेष लक्षवेधी ठरलेले म्हणजे, पूर्वी ओम ब्रह्मांड साई गोविंद पथक (मालाड पश्चिम) म्हणून ओळखला जाणारा संघ ७४ लाख रुपयांना अधिग्रहित करण्यात आला असून त्याचे नवीन नाव वाराणसी महादेव अॅसेन्डर्स असे ठेवण्यात आले आहे.
या अधिग्रहणाबाबत बोलताना अस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर्सच्या कार्यकारी अध्यक्षा अक्षा कंबोज यांनी सांगितले की, “प्रो गोविंदा लीगमध्ये भाग घेणं हा आमच्यासाठी केवळ क्रीडा सहभाग नाही, तर भारताच्या युवा पिढीच्या सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान आहे.” वाराणसी महादेव अॅसेन्डर्स हा संघ केवळ गोविंदांचं प्रतीक नसून, परंपरेचा आणि आधुनिक क्रीडा कौशल्यांचा संगम आहे.
प्रो गोविंदा लीग ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत मान्यतेने आयोजित करण्यात आलेली पहिली व्यावसायिक दहीहंडी स्पर्धा आहे. ही संकल्पना राज्याचे परिवहन मंत्री आणि लीगचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून साकार झाली आहे. दहीहंडी हा खेळ केवळ पारंपरिक मर्यादेत न ठेवता, सुरक्षितता, प्रशिक्षण आणि प्रायोजकत्व यांच्या जोरावर आता राष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक क्रीडा स्पर्धेत रूपांतरित झाला आहे.
यंदाच्या मोसमाचे एकूण बक्षीस मूल्य १.५ कोटी रुपये इतके भव्य असून, यामध्ये विजेत्यांना ७५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक संघाला ३ लाख रुपयांचे सहभाग प्रोत्साहन दिले जाणार आहे, जे या लीगला एक गंभीर आणि स्पर्धात्मक व्यासपीठ बनवते. वाराणसी महादेव अॅसेन्डर्स या संघाची मालकीण असलेल्या अक्षा कंबोज यांनी हा संघ केवळ विजयी करणेच नव्हे, तर त्यातून भारतीय संस्कृती आणि युवा ताकद राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याचा निर्धार केला आहे. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या या थरारक लीगसाठी मुंबई सज्ज झाली आहे आणि गोविंदा प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.