मराठीत आजकाल सिनेमातून विविध विषयांची मांडणी करणारे नवनवे दिग्दर्शक आणि लेखक तसेच कलाकार देखील पाहायला मिळत आहे. स्टोरी ऑफ लागिरं आणि अ व्हॅलेंटाईन्स डे या चित्रपटानंतर दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसाठी नवा कोरा सिनेमा घेऊन येत आहेत.या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून “राइंदर” असं सिनेमाचं नाव आहे. ”खोट्या खोट्या वर्दीला आता खरे खरे स्टार आणायचेत“ हे कॅप्शन लिहित दिग्दर्शक रोहित राव यांनी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या चित्रपटाचा भव्य पोस्टर अनावरण सोहळा पुण्यात नुकताच पार पडला. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या नावाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाची निर्मिती एम आर जोकर एंटरटेनमेंट करणार असून सार्थक ढोकले व तुषार होरे हे या चित्रपटाचे निर्मात्ये आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे करणार असून त्या चित्रपटात ते कलाकार म्हणून झळकणार आहेत. अभिजीत शिंदे सह दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. एम आर जोकर एंटरटेनमेंट प्रस्तुत “राइंदर” हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
“राइंदर” चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्याला दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे, सह दिग्दर्शक अभिजीत दत्तात्रेय शिंदे, निर्माते सार्थक ढोकले, तुषार होरे तसेच चित्रपटातील तंत्रज्ञ उपस्थितीत होते. या सोहळ्याला प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री. प्रकाशशेठ धारीवाल व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षमेघराजराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळीची देखील उपस्थिती होती. सिनेमाचं कथानक काय किंवा यात कोण मुख्य कलाकार आहेत याबाबत अजूनही नावं गुलदस्त्यात आहे. मात्र पोस्टर पाहता सोशल मीडियावर याची चर्चा होताना दिसत आहे. .या सिनेमाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये दिसत आहे.
दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे “राइंदर” चित्रपटाच्या पोस्टरविषयी सांगतात, “राइंदर” या शब्दाचा अर्थ म्हणजे रायरन किंवा बहुरूपी. अशी लोक जे एखाद्या गोष्टीच सोंग घेतात. अशी विचित्र माणस की त्यांच्या विविध छटा असतात. या चित्रपटाची भाषा ग्रामीण असली तरी हा चित्रपट तुमच्या मनावर राज्य करेल याची मी शाश्वती देतो. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरचं सुरू होईल. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”