प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यु-मुम्बा पुन्हा विजयाच्या मार्गावर; तमिळ थलैवाजवर ३५-३२ ने केली मात
नोएडा : मनजीत आणि अजित चौहानच्या चढायांच्या जोरावर मध्यंतराला मिळविलेली २३-१२ ही नऊ गुणांची आघाडी निर्णायक ठरवत यु-मुम्बाने प्रो-कबड्डीच्या ११व्या पर्वातील ५४व्या सामन्यात गुरुवारी तमिळ थलैवाजचा ३५-३२ असा तीन गुणांनी पराभव केला. तमिळ थलैवाजचा बचावपटू नितेश कुमारने हाय फाईव्ह करीत सहा गुणांची कमाई केली. मात्र, नरेंद्र कंडोला आणि सचिन तंवर या चढाईपटूंना आलेले अपयश तमिळ थलैवाजला महागात पडले. या विजयाने यु मुम्बा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला.
यु-मुम्बाकडे असलेली मोठी आघाडी निर्णायक
पूर्वार्धातील अखेरच्या टप्प्यात वेग घेतल्यावर उत्तरार्धात पुन्हा एकदा संथ सुरुवात करण्याचे नियोजन यु मुम्बाला एकवेळ महागात पडणार असे वाटले होते. मात्र, मध्यंतराला मुम्बाकडे असलेली मोठी आघाडी निर्णायक ठरली. मुम्बाने उत्तरार्धात केवळ १२ गुणांची कमाई केली. दुसरीकडे तमिळ संघाने २० गुणांची कमाई करताना सामन्यातील रंगत वाढवली. उत्तरार्धात सामना संथ करताना मुम्बा संघाने अनेक बदल करत आपल्या बहुतेक खेळाडूंचा कस जाणून घेतला. मुम्बाकडून चढाईत मनजीतचे (१०) सुपरे टेन आणि अजित चौहानचे (८) सातत्य निर्णायक ठरले. रिंकूनेही आज ३ पकडी घेतल्या. तमिळकडून नितेश कुमारने बचावात चांगली कामगिरी केली. नरेंद्र कंडोला (४) आणि सचिन (३) या प्रमुख चढाईपटूंना आलेले अपयशच तमिळच्या पराभवाचे कारण ठरले.
तमिळकडून चढाईपटूं सपशेल अपयशी
मध्यंतराला मिळविलेल्या ९ गुणांच्या आघाडीनंतर उत्तरार्धात यु मुम्बा संघाने खेळावरील नियंत्रण कायम राखले होते. मात्र, खेळ संथ करत त्यांनी तमिळ थलैवाजला सामन्यात परत येण्याचे जणू खुले आव्हान दिले. मात्र, याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. उत्तरार्धात देखिल पहिली दहा मिनिटे अशीच संथ गेली. त्यानंतरही यु मुम्बाने मंध्यतराच्या आघाडीचा फायदा घेत ती वाढवण्याचे काम चोख बजावले. सामन्याच्या अखेरच्या सत्रापर्यंत यु मुम्बा १० ते ११ गुणांची आघाडी राखून होते. पण, सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना तमिळ थलैवाजच्या शफागीने यु मुम्बाच्या तीन खेळाडूत अव्वल चढाई करत तिघांनाही बाद केले आणि लोणचे दोन असे पाच गुणांची कमाई केली. त्यामुळे गुणफलक एकदम ३५-२४ वरुन ३५-२९ असा झाला. त्यानंतर अखेरच्या ४५ सेकंदात तमिळने सामना किमान बरोबरीत आणण्यासाठी चांगले प्रयत्न केले. पण, केवळ तीन गुणांची कमाई करता आल्याने तमिळ थलैवाजला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला.
मनजीत, अजित चौहानची सातत्यपूर्ण कामगिरी
पूर्वार्धातील काहिशा संथ सुरुवातीनंतर यु मुम्बाने मनजीत आणि अजित चौहानच्या चढाईच्या जोरावर सामन्यावर नियंत्रण मिळविले. सामन्यातील पहिले दहा मिनिटे दोन्ही संघांनी स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. मात्र, याचा फायदा यु मुम्बाने करुन घेतला. पहिल्या दहा मिनिटांत ९ गुणांची कमाई करणाऱ्या यु मुम्बाने दुसऱ्या टप्प्यातील १० मिनिटांत लोण चढवत एकदम १४ गुणांची कमाई केली. यु मुम्बाच्या चढाईपटूंनी वेगवान चढाई करताना एकवेळ आक्रमकता राखली. यामुळे दोनवेळा तमिळ थलैवाजचे बचावपटू सेल्फ आऊट झाले. यु मुम्बाला रिंकूची बचावात साथ मिळाली. दुसरीकडे तमिळ संघाच्या नेरंद्र कंडोलाला संघाकडून कसलीच साथ मिळाली नाही. सामन्याच्या ९व्याच मिनिटाला सचिनला अपयशामुळे बदलण्याचा निर्णय तमिळ संघाला घ्यावा लागला. बचावाच्या आघाडीवर देखिल त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामनुळे ९-७ अशा सुरुवातीनंतर तमिळला मंध्यतराला २३-१२ असे पिछाडीवर रहावे लागले.