वैभव सूर्यवंशीचे विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi’s quick century : भारताचा उदयोन्मुख खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे त्याचा फॉर्म आहे. त्याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीच्या प्लेट ग्रुप सामन्यात, वैभवने फक्त ३६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सामन्यादरम्यान, त्याने १० चौकार आणि ८ षटकार लगावले. यासह, तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे.
१४ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने बुधवारी रांचीच्या जेएससीए ओव्हल मैदानावर अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी प्लेट ग्रुप सामन्यामध्ये बिहारसाठी शतक पूर्ण करताना त्याने फक्त ३६ चेंडूं घेतले. सूर्यवंशीने १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १० चौकार आणि ८ षटकार मारले.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये याआधी भारतीय फलंदाजाकडून सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगच्या नावावर जमा आहे. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध फक्त ३५ चेंडूंचा वापरत शतक झळकावले होते. अनमोलप्रीतनंतर आता हा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर नोंदवला गेला आहे, ज्याने अरुणाचल प्रदेशविरुद्धही ही कामगिरी बजावली आहे. वैभव हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज देखील ठरला आहे. २४ डिसेंबर २०२५ पर्यंत वैभव सूर्यवंशी १४ वर्षे आणि २७२ दिवसांचा असणार आहे.
लिस्ट ए क्रिकेटममधील जलद शतकाचा विक्रम
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क यांच्या खात्यावर जमा आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या माजी स्टार खेळाडूने ८ ऑक्टोबर २०२३ रोजी अॅडलेडमध्ये तस्मानियाविरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी फक्त २९ चेंडूत १०० धावा फटकावल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर जमा असून डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त ३१ चेंडूचा सामना करत आपले शतक झळकावले होते.






