वेस्ट इंडिज संघ(फोटो-सोशल मीडिया)
West Indies squad announced for India tour: वेस्ट इंडिज कसोटी सामने खेळायला भारत दौऱ्यावर येणार आहे. या भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. माजी कर्णधार क्रेग ब्रेथवेटला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघातून डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये तेगनारायण चंद्रपॉल आणि अॅलिक अथानासे हे कसोटी संघामध्ये स्थान देण्यात आले आहेत.
वेस्ट इंडिज ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबर आणि दुसरा १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामाना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ चक्रातील हा वेस्ट इंडिजचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.
हेही वाचा : ज्वाला गुट्टाकडून ३० लिटर आईचे दूध दान! माजी बॅडमिंटपटूच्या कृतीचे कारण ऐकाल तर व्हाल भावुक..
रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली असून जोमेल वॉरिकनकडे उपकर्णधारपद असणार आहे. तसेच ३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू खारी पियरेचा प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तेगनारायण चंद्रपॉल आणि अॅलिक अथानाझे यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. फिरकी गोलंदाजांचा पर्याय म्हणून संघात पियरेचा समावेश करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
२०१८ च्या भारत दौऱ्यावेळी संघाचे नेतृत्व करणाऱ्या ब्रॅथवेटने या वर्षी मार्चमध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये खराब फलंदाजीमुळे संघातून डच्चू देण्यात आला आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजकडून त्यांच्या वेबसाइटवर सांगण्यात आले की, “अव्वल क्रमातील फलंदाजी मजबूत करण्यासाठी चंद्रपॉल आणि अथानाझे यांना संघात स्थान देण्यात आले आहे, तर वेस्ट इंडिज चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर पियरेचा दुसरा स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने १३.५६ च्या सरासरीने ४१ विकेट्स काढल्या आहेत.
हेही वाचा : PAK vs IND : ‘तुम्ही जिंकला तर इस्लामचा…’, पाकिस्तानी तज्ज्ञाने आपल्याच खेळाडूंना सुनावले खडे बोल
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), केवलन अँडरसन, अॅलिक अथानासे, जॉन कॅम्पबेल, टेग्नारिन चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप (यष्टीरक्षक), टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पियरे, जेडेन सील्स.