इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हा सिझन मनोरंजक होत चालला आहे. आजचा आयपीएल 2024 मध्ये 29 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ एकमेकांशी भिडणार आहेत. आजचा हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामना सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत परंतु चेतेश्वर पुजाऱ्याच्या एका सोशल मीडियाच्या पोस्टने खळबळ उडवली आहे. त्याने केलेल्या पोस्टमुळे पुजारा पुन्हा चेन्नई सुपर किंग्समध्ये परतणार का? असा क्रिकेट प्रेमींना प्रश्न पडला आहे.
पुजाराने ट्विटरवर (X) रविवारी दुपारी 12 च्या सुमारास पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की ‘सुपर किंग्स या हंगामात तुमच्याशी जोडण्यासाठी उत्सुक आहे.’ त्याच्या या पोस्टनंतर मात्र अनेकांनी अंदाज लावला आहे की कदाचित चेतेश्वर पुजारा पुन्हा चेन्नई संघात सामील होऊ शकतो. या त्याच्या पोस्टवर अनेकजण त्यांनी प्रतिक्रिया देत आहेत.
#SupperKings looking forward to join you guys this season! ?
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) April 14, 2024
पुजारा यापूर्वी 2021 आयपीएल हंगामावेळी चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. त्याआधी झालेल्या लिलावात त्याला चेन्नईने 50 लाखांच्या किंमतीत संघात घेतले होते. मात्र, या हंगामात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. काही चाहत्यांच्या मते सध्या चेन्नईचा फलंदाज डेवॉन कॉनवे दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो अद्याप संघात सामील झालेला नाही. तसेच त्याच्या बदली खेळाडूचीही घोषणा अद्याप चेन्नईने केलेली नाही. त्यामुळे कॉनवेच्या जागेवर पुजाराला चेन्नई संघात संधी मिळू शकते असे अंदाज बांधले जात आहेत.