भारतीय महिला क्रिकेट संघ(फोटो-सोशल मिडिया)
Women’s Tri-Series : सलामीवीर प्रतीका रावलच्या शानदार नाबाद अर्धशतकानंतर फिरकी गोलंदाज स्नेह राणा आणि पदार्पण करणाऱ्या श्री चरणीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी झालेल्या महिला तिरंगी मालिकेतील पावसामुळे व्यत्यय आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात लंकेचा नऊ विकेट्सने पराभव केला. पावसामुळे सामना तीन तास उशिरा झाला आणि ३९ षटकांचा खेळ करण्यात आला. भारताने श्रीलंकेला ३८.१ षटकांत १४७धावांत गुंडाळले. ऑफस्पिनर राणा आणि डावखुरा फिरकीपटू चरणी यांनी प्रत्येकी आठ षटकांचा कोटा पूर्ण केला आणि अनुक्रमे ३१ धावा देत तीन आणि २६ धावा देत दोन बळी घेतले. अनुभवी ऑफस्पिनर दीप्ती शर्मानेही ५.१ षटकांत २२ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : IPL 2025 : ‘RCBसह ‘हे’ संघ IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये पोहचणार’, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाची भविष्यवाणी..
भारताने हे लक्ष्य २९.४ षटकांत एका गडी गमावून सहज गाठले. अनुभवी स्मृती मानधना (४३) हिने संघाला जलद सुरुवात दिली त्यानंतर प्रतीका (नाबाद ५०) आणि हरलीन देओल (नाबाद ४८) यांनी नाबाद ९५ धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. भारताचा पुढील सामना २९ एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. या वर्षी आयर्लंडविरुद्ध १५४ धावा करणाऱ्या प्रतीकाने तिच्या सातव्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून वरच्या क्रमांकावर आपला दावा मजबूत केला. तिने मानधनासोबत पहिल्या विकेटसाठी ५९ चेंडूत ५४ धावांची भागीदारी करताना संयमी फलंदाजी केली. मानधनाच्या बाद झाल्यानंतर, तिने तिचा स्ट्राइक रेट सुधारला आणि हरलीनसोबत १२० चेंडूंमध्ये नाबाद ९५ धावांची भागीदारी केली. ३०व्या षटकात एक धाव घेऊन तिने सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले.
टीम इंडियाच्या गोलंदाजांना फायदा त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला आणि येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. वीस वर्षीय श्री चरणी यांनी त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यातच प्रभावी कामगिरी केली, त्यांनी आठ षटकांत फक्त २६ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. मध्यमगती गोलंदाज काशवी सुदेश गौतमचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. जरी तिला एकही विकेट घेता आली नाही, तरी तिने किफायतशीर गोलंदाजी केली आणि आठ षटकांत २८ धावा दिल्या. लंकेचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. हसिनी परेराने ३० धावा केल्या तर कविशा दिलहारीने २६ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले.
आयपीएल २०२५ मध्ये काल(२७ एप्रिल) झालेल्या ४६ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले आहे. या विजयासह आरसीबी पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहचली आहे. आरसीबीने डीसीला त्यांच्या घरच्या मैदानावरच ६ विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाची कामगिरी निराशाजनक होती. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १६२ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीवर विजय मिळवला. विराट कोहलीने ४७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या तर कृणाल पंड्याने शानदार फलंदाजी करत ४७ चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या.