जिममध्ये वर्कआऊट करताना २७० किलोचं वजन पडलं मानेवर; सुवर्णपदक विजेत्या महिला पॉवरलिफ्टरचा मान मोडून मृत्यू
राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा जिममध्ये पॉवरलिफ्टिंगचा सराव करताना मृत्यू झाला आहे. यश्तीकाने २७० किलो वजन उचललं होतं. मात्र तिचा तोल गेला आणि वजन तिच्या मानेवर पडलं. तब्बल २६० किलो वजन मानेवर पडल्याने यष्टिकाच्या मानेला गंभीर दुखापत झाली. यष्टिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
बिकानेरची राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर १७ वर्षीय यश्तिका आचार्य राजस्थानमधील बिकानेरमधील नथ्थुसर गेट येथील बडा गणेश मंदिराजवळील द पॉवर हेक्टर जिममध्ये सराव करत होती. तिने तिच्या मानेवर २७० किलो वजन उचलले. मात्र यष्टिकाच्या मानेवर वजन पडलं आणि ती खाली कोसळली. यावेळी तिचा धक्का तिच्या प्रशिक्षकालाही लागला. तोही मागे जाऊन कोसळला. यष्टिका त्यानंतर बेशुद्ध पडली. जिममध्येच तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या खेळाडूंनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्यासोबत जिममध्ये सराव करणाऱ्या इतर खेळाडूंनी सांगितले की, यष्टिका दररोज प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत होती.
17-year-old weightlifter Yashtika Acharya died in Bikaner, she was lifting 270 kg weight during training pic.twitter.com/kruJfmHZwW
— Rishikesh Kumar (@RishikeshViews) February 19, 2025
अलीकडेच, गोव्यात झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत यष्टिकाने सुवर्ण आणि क्लासिक प्रकारात रौप्य पदक जिंकलं होतं. यष्टिकाचे वडील कंत्राटदार आहेत. यष्टिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत कुटुंबाकडून या प्रकरणात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.