गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या
गेल्या आठवड्यात मेटा कंपनीने ब्लूमबर्गला सांगितले की, त्यांनी त्यांच्या 2Africa प्रकल्पाचा एक भाग थांबवला आहे. आफ्रिका आणि आखाती प्रदेशांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आखलेली 45,000 किलोमीटर लांबीची एक केबल प्रणाली पाण्याखाली होती. मात्र हा प्रकल्प स्थगित करण्यात आल्याने केबलच्या एका भागावर परिणाम झाला आहे. हा भाग ओमान, संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरीन, कुवेत, इराक, पाकिस्तान, भारत आणि सौदी अरेबियामधील लँडिंग स्टेशनमधून जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
केबल टाकण्याची जबाबदारी असलेल्या फ्रान्सच्या सहकारी मालकी कंपनी अल्काटेल सबमरीन नेटवर्कने त्यांच्या ग्राहकांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीने असेही कळवले आहे की, त्यांचे इन्स्टॉलेशन जहाज, ‘इले दे बात्झ’, सौदी अरेबियातील दम्मामच्या किनाऱ्याजवळ अडकले आहे.
असं सांगितले जाते की, तांबडा समुद्र आणि पर्शियन आखातीखाली समुद्रतळावर टाकलेल्या शेकडो फायबर ऑप्टिक्स केबलमधून जगातील 95% पेक्षा जास्त इंटरनेट ट्रॅफिक वाहून नेले जाते. म्हणजेच तुमचा ईमेल, व्हिडिओ कॉल, क्लाऊड सेवा, आर्थिक व्यवहार, व्हिडिओज स्ट्रिमिंग यांसारखी सर्व डिजिटल कामे केबल्सवर अवलंबून असतात. या केबल्स ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्यांनी आखाती प्रदेशात उभारलेल्या विशाल डेटा सेंटर्सना जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांशी जोडतात. त्यामुळे जर युद्धामुळे या केबल्सवर कोणताही परिणाम झाला तर संपूर्ण जगावर याचा परिणाम होऊ शकतो. भारतासह इतर अनेक देशातील इंटरनेट विस्कळीत होऊ शकते.
Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा
गेल्या वर्षी तांबड्या समुद्रात केबल तुटल्यामुळे भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. याचा परिणाम नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झाला होता. पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.






