Google Map ने घेतला तिघांचा जीव! चालकाने अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरुन कार नेली अन्...
आजकाल कुठेही प्रवास करणे सोपे झाले आहे. गुगल मॅपच्या माध्यमातून कुठेही प्रवास कोणत्याही त्रासाशिवाय करता येतो. परंतु, अनेक वेळा प्रवास करताना जीपीएसची मदत घेतल्यानेही समस्या निर्माण होतात. गुगल मॅपच्या चुकीच्या रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकदा लोकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला आहे. अशी एक घटना आता उत्तरप्रदेशात देखील घडली आहे.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे 3 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. चालकाने अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावर कार नेली आणि ती कार रामगंगेत पडली. या अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला. गुगल मॅपच्या चुकीच्या रस्त्यामुळे आता आणखी तिघांचा बळी गेला आहे. (फोटो सौजन्य – X)
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार,चालक गुगल मॅपच्या मदतीने गाडी चालवत होता. गुगल मॅपवर दाखवल्याप्रमाणे त्याने रामगंगावरील पुलावर गाडी नेली. पण पुलाचं बांधकाम अर्धवट झालं आहे आणि पुढे रस्ता नाही हे ड्रायव्हरच्या लक्षात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गाडी नदीत पडली आणि तिघांचा मृत्यू झाला.
रविवारी सकाळी अल्लापूर गावातील लोक रामगंगेच्या दिशेने निघाले असता त्यांना पाण्यात रक्त वाहत असल्याचे दिसले. पुढे गेल्यावर एक कार खाली पडल्याचे दिसले, त्यात तीन जण अडकले होते. तिघांचाही मृत्यू झाला होता. यानंतर या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. तिन्ही तरुण फारुखाबाद येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी फर्रुखाबाद येथील रहिवासी कौशल आणि विवेक हे दोन भाऊ गाझियाबादहून आपल्या मित्रासोबत येत होते. गुगल मॅपच्या मदतीने त्यांनी रस्ता शोधला होता. गुगल मॅपवर या तिघांना पुलावर जाण्याचा मार्ग दाखवला, त्यामुळे चालकाने गाडी पुलावर वळवली. रात्री अंधार पडला होता. त्यामुळे पुलाचं बांधकाम अर्धवट झालं आहे, हे चालकाच्या लक्षात आलं नाही. पुलावरून काही अंतरावर गाडी पुढे नेताच ती रामगंगेत पडली आणि गाडीमधील तिघांचा मृत्यू झाला.
सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन जण जागीच ठार झाले तर या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुढली तपास सुरु केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत्यूपूर्वी गंभीर जखमी कारचालकाने गुगल मॅपवरून मार्ग चेक केला होता. हा अपघात जीपीएस नेव्हिगेशनमुळे झाला आहे. गाडीमधील तिघेही गुरुग्रामहून फरीदपूरला लग्न समारंभासाठी जात होते.