Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामला नोटीस जारी केली असून 15 दिवसांत त्यांची पायरसीविरोधी प्रणाली अधिक मजबूत करणं आणि यावर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारचं असं म्हणणं आहे की, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाइरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेट आणि मोठ्या प्रमाणात कॉपीराइट कंटेंट शेअर केला जात आहे. यामुळे फिल्म इंडस्ट्री आणि क्रिएटर इकोनॉमीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने टेलिग्रामला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले पाइरेटेड चित्रपट आणि कॉपीराइटचे उल्लंघन करणारे ऑडिओ-व्हिडीओ कंटेट ओळखणे, त्याची तक्रार करणे, त्यावर प्रवेश बंद करणे आणि असा कंटेट काढून टाकण्यासाठी एक मजबूत पद्धत तयार करावी. याशिवाय सरकारचं असं मत आहे की, केवळ तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंटेट हटवणं पुरेसे नाही. प्लॅटफॉर्मला स्वत: अशा कंटेटची ओळख पटवावी लागेल आणि वेळीच असा कंटेट हटविण्यासाठी महत्त्वाची पाऊलं उचलावी लागणार आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामकडे त्यांच्या तक्रार निवारण प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती मागितली आहे. सरकारला जाणून घ्यायचे आहे की, चित्रपट निर्माता, ओटीटी प्लॅटफॉर्म, ब्रॉडकास्टर आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था पाइरेटेड कंटेंटची तक्रार कशा पद्धतीने दाखल करतात आणि या तक्रारींवर किती वेगाने कारवाई केली जाते.
सरकारने टेलिग्रामला अशा यूजर्स आणि नेटवर्कच्या विरोधात देखील कठीण कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, जे वारंवार पाइरेटेड कंटेंट शेअर करतात. यामध्ये केवळ पर्सनल अकाऊंटच नाही तर चॅनल, ग्रुप, बॉट, एडमिन आणि यासंबंधित अनेक नेटवर्क्सचा देखील समावेश आहे. जे लोकं सतत चित्रपट आणि वेब सिरीजची पाइरेटेड कॉपी लोकांपर्यंत पोहोचवतात, अशा लोकांचे नेटवर्क पूर्णपणे नष्ट करण्याचे सरकारचे उदिष्ट आहे.
सरकारने टेलिग्रामला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या 15 दिवसांत टेलिग्रामला एक सविस्तर कारवाई अहवाल (एटीआर) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या अहवालात टेलिग्रामला सांगावे लागेल की, पाइरेटेड कंटेंटची ओळख, त्यांच्यावर रोख आणि असा कंटेट हटविण्यासाठी कोणती पाऊलं उचलली आहेत.






