संग्रहित फोटो
पिंपरी/विजया गिरमे : स्मार्टफोन… आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग. सकाळी डोळे उघडताच मोबाईलकडे पाहणे आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचा मेसेज पाहणे, हे आता प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग बनले आहे. व्यवसाय, शिक्षण, बँकिंग, आरोग्यसेवा, खरेदी, सामाजिक संपर्क सर्वकाही आता एका छोट्याशा मोबाईल स्क्रीनवर. या डिजिटल क्रांतीने जीवन सुलभ केले असले तरी त्याच मोबाईलचा अतिरेकी वापर आता आरोग्य, सामाजिक जीवन आणि मुलांच्या भविष्यावर सावट बनत चालला आहे.
जीवन सुलभ, पण धोके गंभीर
पिंपरी-चिंचवडसह देशभरात मोबाईल वापराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परंतु, त्याचबरोबर आरोग्य तज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांनी दिलेला इशारा चिंताजनक आहे. रस्त्यावर चालताना, वाहन चालवताना किंवा अगदी जेवताना सुद्धा मोबाईलकडे लक्ष असणे, हा ‘नवा रोग’ बनला आहे. वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरात घडणाऱ्या अनेक अपघातांमागे “मोबाईल वापर” हे प्रमुख कारण म्हणून समोर आले आहे. वाहन चालवताना मेसेज, कॉल किंवा सोशल मीडिया वापरण्यामुळे लक्ष विचलित होऊन गंभीर अपघात होत आहेत.
लहान मुलांवर मोबाईलचे सावट
सर्वाधिक धोक्याची घंटा मुलांमध्ये वाजते आहे. पिंपरी-चिंचवड महानगरातील काही शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, १२ ते १८ वयोगटातील जवळजवळ ७० टक्के विद्यार्थी मोबाईलवर अति अवलंबून आहेत. ऑनलाइन गेम्स, व्हिडिओज आणि सोशल मीडिया अॅप्सवर तासन्तास वेळ घालवणाऱ्या या पिढीचे लक्ष अभ्यासाकडून विचलित होत आहे. खेळणे, वाचन, मैत्री, सामाजिक संवाद या सर्वांवर याचा थेट परिणाम होत आहे.
मोबाईल वापराचे नकारात्मक परिणाम
वाहतूक अपघात : वाहन चालवताना मोबाईल वापरणे अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे.
आरोग्य समस्या : उशिरापर्यंत फोन वापरल्याने झोपेवर व डोळ्यांवर परिणाम.
मुलांवरील प्रभाव : अभ्यास, खेळ आणि सामाजिक कौशल्यांवर विपरीत परिणाम.
मानसिक तणाव : सतत सोशल मीडिया वापरामुळे एकांत, असुरक्षितता आणि नैराश्य वाढते.
उपाय – संतुलित वापराचा मार्ग
मोबाईलवर पूर्ण बंदी लावणे शक्य नाही, पण ‘स्मार्टफोन वापरा, पण स्मार्टपणे’ हीच काळाची गरज आहे.
वाहन चालवताना मोबाईल वापर टाळा.
मुलांसाठी स्क्रीन टाइमचे नियम ठरवा.
झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास मोबाईलपासून दूर रहा.
सोशल मीडियासाठी ठराविक वेळ ठेवा.
कुटुंबीयांसोबत प्रत्यक्ष संवाद वाढवा.
मोबाईल साथीदार की संकट?
मोबाईलमुळे जग मुठीत आले, पण त्याच मुठीत आपण स्वतःला कैद करून घेतले आहे का, हा प्रश्न आता प्रत्येकाला पडत आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग ‘स्मार्ट’रीत्या झाला तर ते वरदान ठरू शकते; पण त्याचाच अतिरेक झाल्यास ते जीवनासाठी ‘डिजिटल विष’ ठरते. संतुलन राखले, तर मोबाईल हा जीवनाचा साथीदार ठरेल, नाहीतर तोच होईल आधुनिक युगाचा “मूक शत्रू”.
कोविडनंतर ऑनलाइन शिक्षणामुळे मुलं मोबाईलला जास्त सरसावली. पण आता अभ्यासाऐवजी गेम्स आणि व्हिडिओमध्येच वेळ जातो. त्यामुळे आम्ही घरी स्क्रीन टाइमसाठी ठराविक वेळ ठेवला आहे. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्यावर पूर्ण बंदी केली आहे.”
– शुभांगी जोशी, पालक
आधुनिक जीवनशैलीत मोबाईल हा रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. तानुल्या बाळांना शांत करण्यासाठी किंवा खाऊ घालण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल पुढे मुलांच्या हातात कायमचा खेळणे बनतो आणि ते नकळत इंटरनेटच्या मायाजालात अडकतात. मोबाईलचा अतिरेक झोप, डोळ्यांचे आरोग्य आणि वर्तनावर परिणाम करतो. यावर उपाय एकच ठराविक वेळेतच वापर, दिवसातील काही वेळ ‘नो मोबाईल’, आणि सुट्टीच्या दिवशी ‘मोबाईल विरहित दिवस’. या सवयी अंगीकारल्यास मुलांना मोबाईलचे व्यसन लागणार नाही आणि त्यांचे मानसिक-शारीरिक आरोग्य सुरक्षित राहील. – डॉ. ललितकुमार धोका, बालरोगतज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड.