फोटो सौजन्य - Social Media
भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला स्मार्टफोन ब्रँड रिअलमी आणि जगप्रसिद्ध अॅस्टन मार्टिन फॉर्म्युला वन® टीम यांनी तीन वर्षांची महत्त्वपूर्ण रणनीतिक भागीदारी जाहीर केली आहे. या कराराअंतर्गत दोन्ही ब्रँड्सने एकत्र येऊन ‘रिअलमी जी टी 7 ड्रीम एडिशन’ हे सह-ब्रँडेड मॉडेल तयार केले असून, त्याचा जागतिक लॉन्च 27 मे रोजी पॅरिसमध्ये होणार आहे.
रिअलमीने नेहमीच युवा वापरकर्त्यांसाठी नाविन्यपूर्ण, कार्यक्षम आणि डिझाइन-केंद्रित स्मार्टफोन्स सादर केले आहेत. अचूक अभियांत्रिकी आणि प्रीमियम डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅस्टन मार्टिनसोबतची ही भागीदारी म्हणजे रिअलमीच्या तंत्रज्ञानावरील बांधिलकीचं आणखी एक उदाहरण आहे. ‘रिअलमी जी टी 7 ड्रीम एडिशन’ या विशेष मॉडेलमध्ये अॅस्टन मार्टिनचा प्रतिष्ठित “स्कारॅब विंग्स” डिझाइन आणि “अॅस्टन मार्टिन ग्रीन” रंग वापरण्यात आला आहे, जो गाडीच्या ब्रँडसारखाच आकर्षक आणि वेगळा आहे.
या भागीदारीबाबत रिअलमीचे सीईओ स्काय ली म्हणाले, “अॅस्टन मार्टिन अॅरामकोसारख्या प्रतिष्ठित रेसिंग टीमसोबतची ही भागीदारी आमच्यासाठी नाविन्य आणि उच्च दर्जाचा संगम साधणारी आहे. आमची तत्त्वं आणि उद्दिष्टं एकत्र आल्यामुळे ग्राहकांना एक वेगळा अनुभव देण्याची संधी मिळते आहे.”
अॅस्टन मार्टिन अॅरामको फॉर्म्युला वन™ टीमचे लायसेंसिंग व मर्चेंडाइज प्रमुख मॅट चॅपमन यांनी सांगितले, “रिअलमीसोबतचा आमचा पहिला सह-ब्रँडेड फोन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. जी टी 7 ड्रीम एडिशन हे तंत्रज्ञान, डिझाइन आणि कार्यक्षमतेचा उत्तम संगम आहे.” या भागीदारीचा पुढील टप्पा अधिक रोचक ठरणार असून, दरवर्षी दोन नवीन सह-ब्रँडेड स्मार्टफोन्स सादर करण्याचा कंपनीचा मानस आहे. यामुळे आगामी काळात रिअलमीच्या GT सिरीजमध्ये प्रीमियम आणि स्पोर्टी टच अधिक प्रमाणात पाहायला मिळेल. 27 मे रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या जागतिक लॉन्च कार्यक्रमात ‘GT 7 सिरीज’ आणि ‘ड्रीम एडिशन’संबंधी आणखी महत्त्वाचे तपशील उघड होणार आहेत.