Tech tips: हा सीक्रेट नंबर शेअर करणं पडेल महागात, क्षणार्धात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट
आपण बँकेचे कोणतेही व्यवहार करताना आपल्याला बँकेद्वारे एक नंबर पाठवला जातो. जोपर्यंत आपण हा सीक्रेट नंबर आपल्या ट्रांझेक्शनमध्ये अॅड करत नाही, तोपर्यंत आपला व्यवहार पूर्ण होत नाही. कोणताही व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेने शेअर केलेला हा सीक्रेट नंबर फार महत्त्वाचा असतो. वापरकर्त्याची ओळख पडताळण्यासाठी बँकेद्वारे हा सीक्रेट नंबर आपल्याला पाठवला जातो. या सीक्रेट नंबरला ओटीपी म्हणतात.
आपण कोणताही व्यवहार करताना बँक आपल्याल मोबाईल नंबरवर एक ओटीपी सेंड करते. ज्यामुळे तुमचे व्यवहार सुरक्षितपणे केले जाऊ शकतील. ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड. पण सध्या ओटीपी स्कॅम सर्रास घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांच्याकडून ओटीपी मिळवतात. तुम्ही जर तुमचा बँक ओटीपी सायबर गुन्हेगारांसोबत शेअर केला, तर क्षणार्धात तुमचं अकाऊंट रिकामं होईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं. (फोटो सौजन्य – pinterest)
ओटीपी स्कॅम हा फ्रॉडचा एक प्रकार आहे ज्यामध्ये स्कॅमर लोकांकडून त्यांचा वन-टाइम पासवर्ड मिळवण्याचा प्रयत्न करतात. ओटीपी मोबाईल नंबर किंवा ईमेलवर पाठवला जातो आणि तुमच्या ऑनलाइन अकाऊंटमध्ये लॉग इन करण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी वापरला जातो. परंतु, अनेक वेळा सायबर गुन्हेगार लोकांना फसवून ओटीपी जाणून घेतात आणि नंतर त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये प्रवेश करून पैसे उकळतात. अशा घटनांमध्ये सामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ओटीपी स्कॅम कसा काम करतो आणि तुम्ही ते कसे टाळू शकता, याबद्दल जाणून घेऊया.
फिशिंग – सायबर गुन्हेगार अनेकदा लोकांना ईमेल किंवा टेक्स्ट संदेश पाठवून, बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा ओटीपी मिळवण्याचा प्रयत्न करतात.
कॉल करणे – फसवणूक करणारे लोकांना कॉल करून वैयक्तिक तपशील आणि ओटीपी मिळवण्याचा प्रयत्न करतात.
बनावट वेबसाइट – बनावट वेबसाइट स्कॅमर एखाद्या आवडत्या वेबसाइटचा क्लोन तयार करतात आणि लोकांना त्यात लॉग इन करण्यास सांगतात आणि नंतर ओटीपी मिळवण्याचा प्रयत्न करतात.
ओटीपी कधीही शेअर करू नका – तुमचा ओटीपी कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही शेअर करू नका, मग ती व्यक्ती कोणीही असो.
अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला उत्तर देऊ नका – जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तो तुमचा ओटीपी विचारत असेल, तर कॉल डिस्कनेक्ट करा.
तुमचा फोन अपडेट ठेवा – तुमच्या मोबाईल फोनवर किंवा संगणकावर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल करा आणि ते नियमितपणे अपडेट करा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) वापरा – जिथे शक्य असेल तिथे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. हे तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता आणखी मजबूत करते.
बँक खाते नियमितपणे तपासा – तुमचे बँक खाते नियमितपणे तपासा आणि कोणत्याही अनधिकृत व्यवहारांबद्दल तुमच्या बँकेला त्वरित कळवा.