Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
इंस्टाग्रामवर अनेक यूजर्सना त्यांच्या अकाऊंटवर एक ग्रे टिक दिसत आहे. या ग्रे टिकबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक यूजर्सनी असा दावा देखील केला आहे की, ग्रे टिकमुळे त्यांच्या अकाऊंटला पूर्वीसारखी रीच मिळत नाही आणि त्यांनी शेअर केलेल्या रिल्सला पूर्वीच्या तुलनेत खूप कमी व्ह्युज मिळत आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)
अनेक इंस्टाग्राम यूजर्सना त्यांच्या प्रोफाईलवर यूजरनेमच्या बाजूला हलक्या राखाडी रंगाचा चेकमार्क म्हणजेच ग्रे टिक दिसत आहे. हा एक प्रकारचा इंस्टाग्राम प्रॉम्प्ट आहे. याचा अर्थ असा मानला जात आहे की, तुमचे अकाऊंट मेटा व्हेरिफाईड सब्सक्रिप्शनसाठी पात्र आहे.
यूजरनेमच्या बाजूला दिसणाऱ्या या ग्रे टिकवर टॅप करता, तुमच्या समोर मेटा व्हेरिफाईड पर्याय दिसू लागेल. इथून तुम्ही पेड सब्सक्रिप्शन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करू शकता. सब्सक्रिप्शन खरेदी केल्यानंतर तुम्हाला सामान्य ब्लू व्हेरिफाईड बॅज मिळणार आहे. विशेष म्हणजेच तुमच्या फॉलोवर्सना तुमच्या अकाऊंटवरील ही ग्रे टिक दिसणार नाही. अकाऊंटवरील ग्रे टिक केवळ असेच यूजर्स पाहू शकतात, ज्यांच्याकडे हे अकाऊंट लॉगिन आहे.
अनेक यूजर्सनी दावा केला आहे की, ग्रे टिकमुळे त्यांच्या अकाऊंटची रीच पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. तसेच ग्रे टिक मिळालेल्या यूजर्सच्या रिल्स आणि पोस्टवर पूर्वीपेक्षा कमी व्ह्युज मिळत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रे टिकमुळे यूजर्स प्रचंड हैराण झाले आहेत. मात्र ग्रे टिक आणि अकाऊंटची रीच व रिल्सचे व्ह्यु यांचा काही संबंध आहे का, याबाबत अद्याप इंस्टाग्रामने कोणतीही माहिती शेअर केली नाही.
तुमच्या अकाऊंटवर देखील ग्रे टिक दिसत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अकाऊंटची रिच कमी झाली आहे किंवा तुमच्या रिल्स आणि व्हिडीओला पूर्वीसारखे व्ह्यु मिळत नाहीत. अशावेळी मागील 10 ते 15 पोस्ट्सच्या रिल्सची तुम्ही शेअर केलेल्या लेटेस्ट रिल्ससोबत तुलना करा. इंस्टाग्राम इनसाइट्समध्ये पाहा की, लोकं तुमची संपूर्ण रिल पाहत आहेत की, सुरुवातीच्या काही सेकंदातच व्हिडीओ स्किप करत आहेत. यामुळे तुम्हाला समजू शकेल की, खरंच रिच कमी झाली आहे की नाही.






