फोटो सौजन्य - Social Media
स्वच्छता आणि हायजिन या दोन्ही गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्यांसाठी Xiaomi ने एक अत्याधुनिक वॉशिंग मशीन बाजारात सादर केले आहे. Mijia Three-Zone Washing Machine Pro 14Kg नावाचे हे मॉडेल सध्या चीनमध्ये लॉन्च झाले असून जगभरात त्याची चर्चा सुरू आहे. चीनमध्ये या मशीनची किंमत 6499 युआन (भारतात अंदाजे ₹82,666) ठेवण्यात आली आहे. मात्र भारतात ते कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप नाही. या मशीनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यामधील तीन स्वतंत्र ड्रम, ज्यामुळे कपड्यांचे प्रकार आणि त्यांचे धुण्याचे पद्धत वेगळी ठेवता येते. यातील 12 किलोचा मुख्य ड्रम रोजच्या कपड्यांसाठी तर दोन 1-1 किलोचे छोटे ड्रम पूर्ण हायजिनची गरज असलेल्या कपड्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ड्रमसाठी वेगळी पाण्याची प्रणाली आणि स्वतंत्र स्टेरिलायझेशन तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यामुळे एका कपड्याचे बॅक्टेरिया किंवा घाण दुसऱ्यावर जाण्याची शक्यता कमी होते.
या मशीनमध्ये बसवण्यात आलेले अत्याधुनिक स्टेरिलायझेशन तंत्रज्ञान 99.99% बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करू शकते, अशी Xiaomi कडून माहिती देण्यात आली आहे. केवळ बॅक्टेरिया नष्ट करणे इतक्यावरच मर्यादित न राहता, ही मशीन एलर्जी निर्माण करणारे घटक, सूक्ष्म धूळ आणि पॉलनचे कणही दूर करते. त्यामुळे त्वचा संवेदनशील असलेले लोक, लहान मुले किंवा हायजिनला प्राधान्य देणारे कुटुंबीयांसाठी ही मशीन सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. शिवाय, कपडे स्वतंत्रपणे धुतल्यामुळे त्यांच्या वस्त्रगुणधर्मांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही आणि ते अधिक सुगंधित व नितळ निघतात.
वॉशिंग मशीनच्या आजवरच्या तंत्रज्ञानाकडे पाहिले तर बाजारात प्रामुख्याने सेमी ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिक टॉप लोड आणि ऑटोमॅटिक फ्रंट लोड असे तीन प्रकार उपलब्ध आहेत. या पारंपारिक मॉडेल्समध्ये सर्व कपड्यांसाठी एकच ड्रम असल्याने धुण्याची वेळ वाढते आणि काही वेळा विविध प्रकारचे कपडे एकत्र धुतल्याने त्यांचा हायजिन लेव्हल कमी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर Xiaomi चे हे ‘थ्री-झोन’ मॉडेल इतर वॉशिंग मशीनपेक्षा अधिक प्रगत ठरते. स्वतंत्र ड्रम्समुळे वेळेची बचत होतेच, पण त्याचबरोबर धुण्याची गुणवत्ता अत्यंत उच्च दर्जाची राहते.
एकूणच, Xiaomi Mijia Three-Zone Washing Machine Pro 14Kg हे तंत्रज्ञान, स्वच्छता आणि हायजिन या तिन्हींचा परिपूर्ण संगम असलेले प्रीमियम मॉडेल मानले जात आहे. ज्यांना आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची आणि कपड्यांच्या हायजिनची विशेष काळजी असते, त्यांच्यासाठी ही मशीन एक उत्तम आणि भविष्यवादी पर्याय ठरू शकते.






