रक्षाबंधन हा आपला भारतीय सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व असते. बहीण-भावाच्या नात्याला समर्पित हा दिवस मोठ्या उत्साहात आणि प्रेमाने साजरा केला जातो. हा दिवस बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम दर्शवतो. या दिवशी एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य, सुख, समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊही यावेळी आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि नेहमीच तुझ्या पाठीशी खंबीर उभा राहील असे वचन देतो.
भारत आपल्या ऐतिहासिक वस्तूंसाठी जगप्रसिद्ध आहे. देशात तुम्हाला अनेक मंदिरं आणि प्राचीन वस्तू पाहायला मिळतील. प्रत्येक वास्तूचे आपले असे महत्त्व आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक देवी-देवतांची मंदिरे पाहिली असतील मात्र तुम्हाला माहित आहे का? देशात असेही एक चमत्कारी मंदिर आहे, जे बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक मानले जाते. मुख्य म्हणजे या जागी कोणत्या मूर्तीची किंवा फोटोची नाही तर भावा-बहिणीच्या नात्याची पूजा केली जाते. आज आपण याच अनोख्या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेक भाऊ-बहिण या मंदिराला भेट देत असतात . भाऊ-बहिण पहाटे आंघोळ करून मंदिरात जातात. देवाच्या आशीर्वाद घेतल्यावर बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाला समर्पित भारतातील या मंदिराचे नाव भैय्या बहिनी असे आहे. हे मंदिर बिहारमधील सिवान जिल्ह्यात भिखाबंध गावात वसलेले आहे. या मंदिराशी संबंधित मान्यतेनुसार, या जागी भाऊ-बहिणीने एकत्र पूजा केली तर त्यांच्या नात्यात स्नेह आणि विश्वास कायम राहतो. भारतातील सर्वात खास मंदिरांपैकी हे एक आहे.
हेदेखील वाचा – Independence Day 2024: भारतातील ‘या’ राज्यात कधीही साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट! कारण काय? जाणून घ्या
या मंदिराला भेट द्यायचे असल्यास पाटणा विमानतळ हे येथील सर्वात जवळचे विमानतळ आहे. हे विमानतळ बक्सरपासून 125 किलोमीटर अंतरावर आहे. येथून तुम्ही बस किंवा कॅब करू शकता. तुम्हाला रेल्वेने जायचे असल्यास बक्सर हे रेल्वे स्टेशन मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्टेशन दिल्ली, पाटणा, वाराणसी आणि इतर शहरांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही रेल्वे स्टेशनवरून ऑटो, रिक्षा किंवा टॅक्सीने मंदिरापर्यंत पोहचू शकता.