सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या जोशात आणि थाटामाटात साजरा केला जात आहे. घरोघरी गणेशाचे आगमन झाले असून सध्या सर्वत्र एक पवित्र वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवसांत अनेकजण बाप्पाची मनोभावनेने पूजा करत त्याला प्रसाद अर्पण करतात आणि त्याच्या चरणी लीन होतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी गणेशोत्सव एक सण आहे. या उत्सवानिमित्त अनेक भाविक देशातील प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देत असतात. परंतु फार कमी लोकांना ठाऊक आहे की देशात असेही काही रहस्यमयी आणि चमत्कारी मंदिरं आहेत ज्यांचा उल्लेख अनेक पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे. या मंदिरांविषयीच्या भाविकांच्या श्रद्धा प्रचलित आहेत. चला तर मग आज याविषयीच सविस्तर जाणून घेऊयात.
देशातील प्राचीन गणेश मंदिरांचा उल्लेख करताच अनेक लोक प्रथम त्रिनेत्र गणेश मंदिराचे नाव घेताना दिसतात. हे प्रसिद्ध मंदिर राजस्थानच्या सवाई माधोपूरपासून 13 किलोमीटर अंतरावर रणथंबोर किल्ल्याच्या आत आहे. या मंदिराविषयी अशी धारणा आहे की, हे देशातील असे एकमेव मंदिर जिथे भगवान गणेश आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतात. या पवित्र मंदिराचा उल्लेख रामायण काळात आणि द्वापार कालखंडातही असल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार, प्रभू रामाने लंकेला जाण्यापूर्वी या मंदिरातील गणेशाचा अभिषेक केला होता.
हेदेखील वाचा – जगातील या नद्यांना मिळाले आहे एक वेगळे वरदान, येथून बाहेर पडते सोने, भारतातील या नदीचा समावेश
प्राचीन मंदिरांमध्ये कर्नाटकातील श्री विनायक मंदिराचा मुख्यत्वे समावेश होतो. हे मंदिर कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापुरा येथे स्थित आहे. हे मंदिर संपूर्णपणे श्री गणेशाला समर्पित असून हे देशातील एकमेव जलाधिवास गणपती मंदिर असल्याचे म्हटले जाते. भाविकांच्या मान्यतेनुसार, खडकातून गणेशाची तीन फुटांची मूर्ती स्वतःहून बाहेर आली. जे खऱ्या मानाने इथे येऊन गणेशाची पूजा करतात त्यांची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची मान्यता आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन हे धार्मिक स्थळांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथील चिंतामण मंदिर एक रहस्यमयी मंदिर मानले जाते. या मंदिराविषयीची खास आणि अनोखी गोष्ट म्हणजे या मंदिराविषयी बोलले जाते की, हे असे एकमेव मंदिर आहे ज्याच्या उभारणीसाठी स्वतः भगवान गणेश पृथ्वीवर अवतरले होते. या मंदिराबाबत आणखी एक समज अशी आहे की प्रभू रामाने आपल्या वनवासात या मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरातही भाविकांची मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024 : भारतातील प्राचीन रहस्यमयी गणेश मंदिरं, फार कमी लोकांना माहिती आहेत, एकदा नक्की भेट द्या
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात कानिपकम गणेश मंदिर वसलेले आहे. हे प्रसिद्ध आणि रहस्यमयी मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराविषयी असे बोलले जाते की, हे असे एकमेव मंदिर आहे जिथली मूर्ती स्वतःच वाढत राहते. या मंदिरातून एक नदीदेखील वाहते. कनिपकम गणेश मंदिरात जाण्यापूर्वी जो कोणी या नदीत स्नान करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.