फोटो सौजन्य: iStock
ख्रिसमस काही दिवसांवर येऊन राहिला आहे. देशभरात ख्रिसमस साजरा करणासाठी लोकांची तयारी सुर आहे. तर अनेकजण ख्रिसमसच्या उत्साहात परदेशी पर्यटनाची योजना आखत आहेत. तुम्ही देखील परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. IRCTC (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) एक आकर्षक टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही दुबई आणि अबू धाबी या संयुक्त अरब अमीरातच्या (UAE) प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.
पॅकेज शेड्यूल
IRCTC च्या “Dubai Christmas Delight with Abu Dhabi” या टूर पॅकेजद्वारे वर्षाच्या शेवटी परदेशी ट्रिपचा आनंद घेण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. या टूरची सुरुवात 24 डिसेंबर रोजी इंदौरहून होणार आहे. संध्याकाळी 4:40 वाजता फ्लाइटने प्रवास सुरू होईल आणि रात्री 9:55 वाजता दुबईला पोहोचता येईल. पहिल्या दिवशी तुम्हाला आरामासाठी हॉटेलमध्ये नेले जाईल. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 25 डिसेंबरला, प्रवाशांना दुबईतील प्रसिद्ध मार्केट्समध्ये खरेदी करण्याची संधी मिळेल.
याशिवाय, तुम्हाला “मिरेकल गार्डन” आणि दुबई क्रीक येथे ढो क्रूझचा आनंद घेता येईल. संध्याकाळी स्वादिष्ट बुफे डिनरचा आस्वादही घेतला जाईल. नंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला दुबईतील स्पाइस सूक, जुमेराह, बुर्ज अल अरब, दुबई फ्रेम आणि अटलांटिस हॉटेलला भेट देता येईल. तसेच, बुर्ज खलिफा लाइट अँड साउंड शोचा देखील तुम्हाला अनुभव घेता येईल.
चौथ्या दिवशी प्रवाशांना वाळवंटातील सफारीचा रोमांचक अनुभव घेता येईल, त्यानंतर बेली डान्स शो पाहता येईल. पाचव्या दिवशी गोल्ड सूक आणि ग्लोबल व्हिलेजला भेट दिली जाईल. शेवटच्या दिवशी अबू धाबीमधील शेख जायद मशिदी आणि बीएपीएस हिंदू मंदिराचे दर्शन घेऊन टूरचा समारोप होईल. रात्री 8:40 वाजता भारतासाठी फ्लाइट असेल.
टूर पॅकेजची किंमत
या पॅकेजमध्ये एका व्यक्तीसाठी ₹1,18,500, दोन जणांसाठी ₹1,03,000, तर तिन जणांसाठी ₹1,01,000 एवढे शुल्क आहे. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडसह तिकीट ₹99,000, तर बेडशिवाय ₹90,100 आहे. टूर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरचा समावेश आहे. आता IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर (irctctourism.com) जाऊन त्वरित बुकिंग करु शकता आणि या हिवाळ्यात दुबई आणि अबू धाबीच्या अद्भुत प्रवासाचा आनंद घेऊ शकता.