फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सांगली, महाराष्ट्रातील एक निसर्गसंपन्न शहर आहे. हे शहर सध्या पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. हे शहर त्याच्या मार्केटसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. याशिवाय सांगलीला महाराष्ट्रातील सर्वात सुपीक क्षेत्र मानले जाते. हिरव्या वनराईने वेढलेल्या या शहराचे सौंदर्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाल. दरवर्षी अनेक पर्यटक येथे शांतता आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तुम्ही देखील तुमच्या परिवारोसोबत किंवा मित्रांसोबत या ठिकाणाला भेट देऊ शकता. तुमचा थकवा काही मिनिटांतच येथील सौंदर्य पाहून पळून जाईल.
सांगलीच्या आसपास काही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. आज आपण या ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत.
दंडोबा टेकड्या आणि वनसंरक्षण
सांगलीच्या निसर्गरम्य स्थळांमध्ये दंडोबा टेकडी आणि वनसंरक्षण हा निसर्गप्रेमींसाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. सुमारे 28 चौरस किमीमध्ये पसरलेले हे जंगल हिरवळ, शांतता आणि ट्रेकिंगसाठी ओळखले जाते. पावसाळ्यात दंडोबा टेकड्यांवर ट्रेकिंगसाठी पर्यटकांची गर्दी असते. येथे येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येते, जे त्यांना शहरी ताणतणावापासून दूर ठेवते. तुम्ही या ठिकाणाला तुमच्या मित्र परिवारा सोबत भेट देऊ शकता.
हे देखील वाचा- सुर्याच्या पहिल्या किरणांचा अनुभव घ्यायचाय? मग भारतातील ‘या’ गावाला नक्की भेट द्या
सिद्धेवाडी धबधबा
सांगलीतील सिद्धेवाडी धबधबा पावसाळ्यात पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. साधारण 50 फूट उंचीवरून वाहणाऱ्या या धबधब्याच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे आणि मोकळे वातावरण असते. गिर्यारोहण आणि ट्रेकिंगसाठी हा परिसर लोकप्रिय आहे. सांगलीतील पर्यटक येथे नेहमी येतात, विशेषतः पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी. तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
बाहुबली टेकडी मंदिर
सांगलीतील बाहुबली हिल मंदिर हे जैन धर्मियांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. टेकडीवर वसलेले हे पवित्र मंदिर संत बाहुबलीच्या 28 फूट उंचीच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. मंदिरावर जाण्यासाठी 400 पायऱ्या चढाव्या लागतात. यामुळे पर्यटक टेकडीवरून परिसराचे सुंदर दृश्य पाहू शकतात.
कृष्णा नदी
सांगलीतून वाहणारी कृष्णा नदी पर्यटकांसाठी शांत निवांत क्षण अनुभवण्याचे ठिकाण आहे. नदीकाठच्या हिरवाईमुळे आणि थंड वाऱ्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला आरामशीर वाटते. येथील शांत वातावरणात काही वेळ घालवण्यासाठी, मित्र-परिवारासोबत पिकनिकला येथे येणे हा एक चांगला पर्याय आहे.
सांगली किल्ला
सांगलीचा ऐतिहासिक किल्ला 19व्या शतकात श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधला. गोलाकार आकारातील हा किल्ला सांगलीच्या इतिहासाचे प्रतीक मानला जातो. वीकेंडला येणारे पर्यटक येथे पिकनिकसाठी येतात आणि सांगलीच्या समृद्ध वारशाचा आनंद घेतात.
सांगलीत अशी विविध ठिकाणे आहेत, जी निसर्ग, इतिहास आणि अध्यात्मिक अनुभव देऊन तुम्हाला ताजेतवाने करतात