आपल्या कामाच्या व्यापातून थोडा विश्रांतीचा वेळ काढत आपण कोणत्या तरी नवीन ठिकाणी फिरण्याचा प्लॅन बनवतो. मात्र कधीही फिरताना आपल्या सहलीचे नीट नियोजन करणे फार गरजेचे आहे. असे न केल्यास तुमच्या ट्रिपमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आपण ज्या ठिकाणी जात आहोत, त्या ठिकाणची संपूर्ण माहिती काढणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा भटकंती करताना आपल्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो अशावेळी आपण जिथे जात आहोत ते ठिकाण सुरक्षित आहे की नाही, याची पुरेपूर माहिती काढायला हवी.
सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, जसे की तेथील राहणीमान, गुन्ह्याचे प्रमाण काय आहे, अशा सर्वच गोष्टी जाणून घेणे अधिक गरजेचे आहे. याच पार्शभूमीवर फोर्ब्सच्या सल्लागाराने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये पर्यटनासाठी जगातील सर्वात असुरक्षित शहरांबद्दल माहिती देण्यात आली आहे. या यादीच्या शीर्षस्थानी जगातील सर्वात असुरक्षित शहरांची नावे देण्यात आली आहेत, तर सर्वात खालच्या क्रमांकावर जगातील सर्वात सुरक्षित शहरे आहेत. या यादीच्या मदतीने, पुढील प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या ठिकाणांना भेट देणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – World’s Safest Cities 2024: जगातील 5 सर्वात सुरक्षित शहरांची नावे, जाणून घ्या
कराकस हे जगातील सर्वात धोकादायक शहर म्हणून ओळखले जाते. याजागी गुन्हेगारीचे प्रमाण, नैसर्गिक आपत्ती आणि सुरक्षितता या बाबींवर या शहराला 100 पैकी 100 गुण देण्यात आले आहेत. याचाच अर्थ हाणामारी, लूटमार यासारख्या घटना येथे जास्त प्रमाणात घडत असतात.
पाकिस्तानातील कराची हे शहरदेखील धोकादायक शहरांच्या यादीत सामील झाले आहे. हे जगातील दुसरे सर्वात धोकादायक शहर बनले आहे. या शहरातील गुन्हेगारीचे प्रमाणही लक्षणीय वाढले असून, ते पर्यटकांसाठी धोकादायक आहे.
म्यानमारमधील यांगून हे शहर धोकादायक शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरातील डिजिटल सुरक्षेची स्थिती अत्यंत वाईट आहे आणि गुन्हेगारीचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळेच हे शहर पर्यटकांसाठी धोकादायक ठरते.
लागोस हे जगातील चौथ्या क्रमांकाचे धोकादायक शहर आहे. गरिबीमुळे या शहरात चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत. इथे गुन्हेगारीचे प्रमाण फार आहे, ज्यामुळे हे शहरदेखील पर्यटकांसाठी धोकादायक ठरते.
मनिला हे जगातील पाचवे सर्वात धोकादायक शहर ठरले आहे. या जागीही चोरीच्या आणि मारहाणीच्या अनेक घटना घडतात. तसेच या जागीची सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत ढासळलेली आहे.