शिकण्याची इच्छा असेल तर माणूस केव्हाही शिकू शकतो. कारण शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. केरळची कुट्टीअम्मा (Kuttiyamma) आजी याचंच एक मूर्तीमंत उदाहरण आहे. केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी असलेल्या कुट्टीअम्मा या आजीची अभ्यासाची दांडगी इच्छा पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. कुट्टीअम्मा या आजी केरळमधील साक्षरता मोहिमेच्या (Kerala Literacy Mission) परीक्षेत पास झाल्या.आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांनी वयाच्या 104 व्या वर्षी केरळ साक्षरता परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवले आहेत. ही माहिती उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटरवर (Twitter) दिली आहे.
A lesson for every school-going child:the expression on this lady’s face shows how privileged you are to receive an education. And a lesson to all of us:The greatest joy & satisfaction in life comes from the privilege of learning something new every single day. #MondayMotivation https://t.co/bZhkZGefg7
— anand mahindra (@anandmahindra) February 13, 2023
खरंतर, केरळमधील कुट्टीअम्मा या 2021 मध्येच साक्षरता परीक्षेत पास झाल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय 104 वर्ष होतं. मात्र, आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर या बातमीची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आनंद महिंद्रा नेहमीच लोकांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी ट्वीटरवर शेअर करत असतात.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलासाठी हा एक धडा आहे. या महिलेच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवतात की तुम्हाला शिक्षण मिळणे हा किती मोठा विशेषाधिकार आहे. हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. जीवनातील सर्वात मोठा आनंद आणि समाधान प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्यातून मिळतो.”
या आजी कधीच शाळेत गेल्या नाहीत. साक्षरता परीक्षेची तयारी करताना त्यांनी पहिल्यांदा हातात पेन आणि कागद घेतला. केरळचे शिक्षण मंत्री वासुदेवन शिवनकुट्टी यांनी त्यांचा फोटो ट्वीट करत साक्षरता परीक्षेत त्यांना 100 पैकी 89 गुण मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. कुट्टीअम्मा 104 व्या वर्षीही पूर्णपणे निरोगी आहेत. कुट्टीअम्मा सांगतात की, स्वतःची कामं स्वत: केल्यामुळे आणि आयुर्वेदामुळे मी तंदुरुस्त आहे. माझ्या काळात मुलींच्या शिक्षणावर भर दिला जात नव्हता, तर मुलंही चौथीच्या पुढे शिकत नव्हती. माझे वडील भूमिहीन शेतकरी होते.