parents drinking

नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने घरीच साजरे करण्यासाठी राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे. मात्र त्यासोबतच अल्पवयीन मुलांना व्यसनापासून(addicted children) दूर ठेवणे हे एक मोठे आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे.

मुंबई: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन(new year celebration) करण्यासाठी खाजगी बंगले, पंचतारांकित हॉटेल्स तसेच शहरातील स्थानिक हॉटेल्स, पब्स- बार सज्ज झाले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने घरीच साजरे करण्यासाठी राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे. मात्र त्यासोबतच अल्पवयीन मुलांना व्यसनापासून(addicted children) दूर ठेवणे हे एक मोठे आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे.

नवीन वर्ष साजरे करणे म्हणजेच दारू पिणे ही संकल्पना समाजामध्ये रुजू लागली आहे. लॉकडाऊनमुळे दारू पिणे म्हणजे मानसिक ताणतणाव दूर करणे अशी नवीन व्याख्याच तयार झाली कारण लॉकडाऊन थोडासा हटल्यानंतर सर्वात जास्त विक्री झाली असेल तर ती दारूची! कोरोना महामारीच्या संकटात भारतासह ब्राझील, अमेरिका आणि अनेक युरोपीय देशात मद्यविक्रीत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज समाजामध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढते आहेच, परंतु आता ते १२ वर्षांपर्यंत खाली आले आहे. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार अल्पवयात दारू पिणाऱ्या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता १५ टक्के असते. त्यामुळे मुलांमधील मद्यपानाचे वाढते प्रमाण हे भावी पिढीसाठी धोक्याची घंटा आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे सांगतात की, लॉकडाऊन होण्यापुर्वी मुलांच्या समस्या या वेगळ्या होत्या व लॉकडाऊन झाल्यानंतर मुलांच्या समस्यांमध्ये अजून भर पडली आहे. आता लॉकडाऊन संपले आहे. न्यू नॉर्मल म्हणत वर्क फ्रॉम होम, डिजिटल शिक्षण, वेबिनार मीटिंग याकडे वळत असताना साहाजिकच स्क्रीन टाइम अजून वाढला आहे. त्यासोबतच मुले गेले ८ महिने घरी राहिल्यामुळे पालक आपल्या मुलांवर बाहेर जाण्यासाठी कोणतीही बंधने घालत नसल्याचे दिसत आहे व हेच स्वातंत्र्य कदाचित त्यांना व्यसनाकडे नेण्यास कारणीभूत ठरेल अशी भीती आहे.

दरवर्षी नवीन वर्ष ‘न्यू नॉर्मल’ सेलिब्रेट करण्याच्या नावाखाली अनेक तरुण-तरुणी दारू, ड्रग्स , हुक्का व इतर अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत हे गेल्या आठ दिवसात मुंबईत पोलिसांनी बार व पब्जवर पाडलेल्या धाडीतून समोर आले आहे. आपली मुले गेली ८ – ९ महिने घरात राहून कंटाळली आहेत. आता त्याना त्यांचे आयुष्य जगू देऊ या अशी भावना कुठेतरी वाढीस लागली असून यामुळे अल्पवयीन तरुण तरुणी व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गेल्या आठ महिन्यांमध्ये लॉकडाऊनमुळे मुलांच्या समोर मद्यपान, धूम्रपानाची लागलेली सवय समाजस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंताजनक म्हणावी लागेल कारण घरातच असलेली दारूची उपलब्धता हे अल्पवयीन मुलांचे व्यसनाधीन होण्याचे एक कारण आहे.

मुलांमधील व्यसनाधीनता व पालक याचे विश्लेषण करताना मनोविकार तज्ञ डॉ ओंकार माटे सांगतात,  किशोरावस्था ही जीवनातील अत्यंत नाजूक अवस्था असते. या काळात मनावर जे बिंबवले जाते किंवा जे बिंबवले जाते त्याचे दीर्घकालीन परिणाम मुलांच्या मनावर होत असतात. २०१४ साली झालेल्या ‘असोचॅम’च्या पाहणीत ज्या मुलांनी आपल्याला मद्यपानाचे व्यसन कसे लागले याबाबतची माहिती दिली आहे, ती पाहिल्यावर समाजातील बदललेल्या संस्कृतीचे स्वरूप लक्षात येते.

या पाहणीत मुले म्हणाली आमचे आई-वडील ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी आम्हाला घरात ठेवून बाहेर जातात. अशा वेळी काही मित्रांनी आपणही ३१ डिसेंबर साजरा केला व मद्याची चव चाखवली. पुढे आम्हाला या चवीची चटकच लागली, नववर्ष मद्याच्या धुंदीतच साजरी करायची हा अलीकडच्या काळातला रिवाज बनला आहे.

बेधुंद पद्धतीने नववर्षाचं स्वागत करण्यास सर्वच जण पुढे असतात. मात्र, याचा परिणाम पौगंडावस्थेतल्या मुलांवर किती विपरित पद्धतीने होतो आहे, याची जाणीव कोणच ठेवताना दिसत नाही. ‘बीअर म्हणजे दारू नाही, तू घेऊ शकतोस,’ असं सांगत आग्रह करणारे या मुलांचे मित्र जसे आहेत तसे अगदी पालकही आहेत. मात्र बीअरपासून सुरू झालेला प्रवास रम, व्होडका, व्हिस्की किंवा कधी कधी देशी दारूपर्यंत कधी पोहोचतो हे त्या मुलांनाही कळत नाही हीच आपल्या समाजातील शोकांतिका आहे.