israel rocket

इस्रायलनं पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा केली आहे.

    रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia -Ukraine War) जगाला आणखी एका युद्धाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इस्रायलनं पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर युद्धाची (Israel Palestine War) घोषणा केली आहे. त्यामुळे गाझा पट्टी व आसपासच्या भागात या युद्धाचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. (War)

    गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया सुरु असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.

    गाझा पट्ट्यातून रॉकेट डागले जाण्याची शक्यता लक्षात घेता इस्रायल सरकारनं आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश दिले आहेत. “मोठ्या संख्येनं दहशतवादी इस्रायलच्या भूमीत शिरले आहेत. इस्रायलकडूनही या हल्ल्यांना जशासं तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यात येत आहेत”, अशी माहिती इस्रायल लष्कराकडून देण्यात आले आहेत.

    एक्सवर(ट्विटर) काही युजर्सनी यासंदर्भातले व्हिडीओ शेअर केले आहेत. हे इस्रायलवर गाझा पट्टीतून डागण्यात आलेल्या रॉकेट्सचे व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे इस्रायलमध्ये नागरिकांनी घरात राहण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले असताना गाझा पट्टीत नागरिकांना घरांवरून रॉकेट वेगाने जात असल्याने, परिसरात सतर्कतेच्या रेड सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. अगदी तेल अवीवपर्यंत हीच स्थिती असल्याचं सांगितलं जात आहे.