Blood Moon eclipse : सप्टेंबरमध्ये पौर्णिमेला आकाशात दिसणार जादुई नजारा; ८ नोव्हेंबर २०२२ नंतरचे सर्वात मोठे पूर्ण चंद्रग्रहण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Corn Moon blood moon 2025 : सप्टेंबर महिना खगोलशास्त्रप्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या महिन्यात संपूर्ण जगाला एक विलक्षण आकाशीय घटना पाहायला मिळणार आहे. ७ सप्टेंबर रोजी ‘कॉर्न मून’ नावाने ओळखला जाणारा पौर्णिमा चंद्रग्रहणाच्या छायेत दिसेल. या वेळी चंद्र लालसर रंगाचा भासणार असून त्याला ‘ब्लड मून’ किंवा रक्तचंद्र म्हणतात.
प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यातील पौर्णिमेला पारंपारिकरीत्या कॉर्न मून किंवा हार्वेस्ट मून असे म्हटले जाते. कारण या काळात शेतीत मका (कॉर्न) व इतर पिकांची कापणी सुरू होते. इंग्रजी संस्कृतीत ही पौर्णिमा शेतकऱ्यांसाठी महत्वाची मानली जाते. तसेच जगभरात या पौर्णिमेला वाइन मून, सॉन्ग मून आणि बार्ली मून अशीही वेगवेगळी नावे आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेतील आणि कॅनडातील स्थानिक जमाती या चंद्राला ‘वाबाबगा गिजिस’ असे म्हणतात, ज्याचा अर्थ होतो पाने बदलणारा चंद्र. कारण या काळात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने झाडांची पाने रंग बदलतात.
या वर्षीचा कॉर्न मून हा केवळ पौर्णिमा नसून जगातील काही भागांसाठी पूर्ण चंद्रग्रहण घेऊन येणार आहे.
ऑस्ट्रेलिया
आशियातील बहुतांश देश
आफ्रिका
युरोपचा काही भाग
येथील नागरिकांना ८२ मिनिटांपर्यंत रक्तचंद्र पाहायला मिळेल. ही घटना ८ नोव्हेंबर २०२२ नंतरची सर्वात मोठी पूर्ण चंद्रग्रहणाची वेळ ठरणार आहे. याआधी १४ मार्च २०२५ रोजी उत्तर अमेरिकेत असाच ६५ मिनिटांचा पूर्ण चंद्रग्रहण दिसेल. त्यामुळे खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही घटना चुकवू नये अशी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनच्या लष्करी परेडला अनुपस्थित राहण्यामागे PM मोदींची राजकीय खेळी; भारताच्या परराष्ट्र धोरणात लपला होता ‘हा’ मोठा संदेश
या चंद्रग्रहणासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची गरज नाही. उघड्या डोळ्यांनीसुद्धा हा नजारा सहज पाहता येईल. मात्र, दुर्बिणी किंवा टेलिस्कोपचा वापर केल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म तपशीलही अधिक स्पष्टपणे दिसू शकतात. पौर्णिमेच्या रात्री जसजशी चंद्राची उजळ वाढत जाते, तसतशी त्याच्याकडे थेट पाहणे कठीण होते. पण या वेळी ग्रहणामुळे चंद्राचा रंग गडद लालसर झाल्याने तो एक वेगळाच मोहक अनुभव देणार आहे.
रक्तचंद्र म्हणजे नक्की काय, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तर त्यामागचं विज्ञान अगदी रोचक आहे.
पूर्ण चंद्रग्रहणावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते.
सूर्यप्रकाश थेट चंद्रावर न पडता पृथ्वीच्या वातावरणातून वाकून जातो.
या वेळी लहान तरंगलांबीचे रंग (निळा, जांभळा) वातावरणात विखुरले जातात.
पण लांब तरंगलांबीचे रंग (लाल, नारंगी) मात्र थेट चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचतात.
यामुळे चंद्र पूर्ण अंधारात न जात, उलट लालसर-केशरी रंगाने चमकत राहतो. हाच तो ब्लड मून किंवा रक्तचंद्र.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अवकाशातील नवे रणांगण! अमेरिकेच्या सुरक्षेचा कणा ठरले ‘स्पेस फोर्स’ आणि ‘स्पेसकॉम’; पाहा का महत्वाचे?
प्राचीन काळी रक्तचंद्राला शुभ-अशुभ घटना जोडल्या गेल्या होत्या. अनेक संस्कृतींमध्ये त्याला बदलाचा संदेश देणारा किंवा नैसर्गिक चमत्कार मानले जायचे. परंतु विज्ञानाच्या प्रगतीनंतर हे समजले की, रक्तचंद्र ही फक्त एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. तरीसुद्धा आजही या चंद्रग्रहणाचा अनुभव हा लोकांसाठी अद्भुत असतो. रात्रीच्या आकाशात लालसर प्रकाशात चमकणारा चंद्र पाहणे ही एक अविस्मरणीय अनुभूती असते. ७ सप्टेंबरचा हा कॉर्न मून म्हणजे खगोलशास्त्र, निसर्ग आणि सौंदर्याचा अद्भुत संगम आहे. रक्तचंद्राचा हा सोहळा नुसता पाहण्याजोगाच नाही, तर अनुभवण्याजोगा आहे. उघड्या डोळ्यांनी हा मोहक नजारा नक्की पाहावा, कारण हा क्षण आयुष्यात फार वेळा येत नाही.