बीजिंग : अरुणाचल प्रदेश (Arunacgal Pradesh) आणि अक्साई चीन आपल्या नकाशात दाखविणारा चीन आता अजब विधान करू लागला आहे. ‘अरुणाचल, अक्साई चीन कायदेशीररीत्या आमचाच भाग आहे. भारताने शांत राहावं, जास्त बोलू नये’, असे म्हटले आहे. तसेच चीनच्या नकाशाची 2023 आवृत्ती जारी करणे ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (दि.30) सांगितले.
चीनने आपला अधिकृत नकाशा 28 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केला. यामध्ये भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र हा आपला प्रदेश म्हणून दाखवण्यात आला होता. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने, दुपारी 3:47 वाजता X अॅपवर नवीन नकाशा पोस्ट केला. चीनचे सार्वभौमत्व आणि अखंडता लक्षात घेऊन हा नकाशा जारी करण्यात आला आहे. हा वाटा कायदेशीररित्या आमचा आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, ‘आम्हाला आशा आहे की संबंधित पक्ष (भारत) या मुद्द्यावर शांत राहील आणि त्यावर जास्त बोलणे टाळेल’. यावर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते की, ‘ही चीनची जुनी सवय आहे. त्यांच्या दाव्याने काहीही होत नाही’.
चीनने अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची बदलली नावे
यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये चीनने आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे बदलली होती. चीनने गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा असा प्रकार केला आहे. यापूर्वी 2021 मध्ये चीनने 15 आणि 2017 मध्ये 6 ठिकाणांची नावे बदलली होती.
नावं बदलण्यामागे चीनचा दावा काय?
2021 मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे बदलली होती. यापैकी 8 निवासी क्षेत्रे, 4 पर्वत, 2 नद्या आणि एक डोंगरातून बाहेर पडण्याचा मार्ग होता. चीनने अरुणाचल प्रदेशाची नावे का बदलली याचा अंदाज तेथील एका संशोधकाच्या विधानावरून लावता येतो.
नाव बदलल्याने वास्तव बदलणार नाही
चीनच्या या कृत्याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले की, ‘चीनच्या अशा कारवाया याआधीही करण्यात आल्या आहेत. आम्ही या नवीन नावांचा स्वीकार करत नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. अशाप्रकारे नाव बदलून वास्तव बदलणार नाही’.






