हिंजवडी फेज–२ मधील गेरा इमारतीत ‘टेकला सोल्युशन’ आणि ‘स्काय सोल्युशन’ ही दोन कॉल सेंटर अनधिकृतपणे सुरू होती. छाप्यात २० हार्ड डिस्क आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
पिंपरी: अमेरिकेतील नागरिकांना लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक करणाऱ्या दोन अनधिकृत कॉल सेंटरचा पर्दाफाश सायबरपोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट–२ने केला आहे. आरोपी अमेरिकन नागरिकांचे क्रेडिट स्कोर सुधारून देण्याच्या नावाखाली माहिती मिळवत आणि त्याद्वारे आर्थिक गैरव्यवहार करीत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चार जणांना अटककरण्यात आली असून १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनधिकृत केंद्रांवर छापा; महत्त्वाची उपकरणे जप्त
हिंजवडी फेज–२ मधील गेरा इमारतीत ‘टेकला सोल्युशन’ आणि ‘स्काय सोल्युशन’ ही दोन कॉल सेंटर अनधिकृतपणे सुरू होती. छाप्यात २० हार्ड डिस्क आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा आढळून आला. या डेटाचा वापर करून कर्मचारी थेट अमेरिकेतील नागरिकांशी संवाद साधत आणि तयार केलेल्या स्क्रिप्टनुसार त्यांना फसवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपी ‘कम्युनिटी चॉईस फायनान्शिअल कंपनी’च्या नावाने कॉल करत. नावेव्हा क्रेडिट स्कोर सुधारून लोन मिळवून देऊ, असे सांगून अमेरिकन नागरिकांना जाळ्यात ओढले जात होते. त्यानंतर त्यांच्याकडून विविध कंपन्यांची कुपन मागवून ती डॉलरमध्ये बदलण्याची फसवणूक केली जात होती.
मेडिकल दाव्यांच्या नावाखालीही फसवणूक
दुसऱ्या पद्धतीत आरोपी स्वतःला अमेरिकेतील मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगत. राउंड अप, टाल्कम पावडर, झॅनटॅक यांसारख्या औषधांमुळे काहींना कर्करोग झाला असल्याचे सांगून, त्यांच्या वतीने कोर्टात दावा दाखल करून मोठी नुकसानभरपाई मिळवून देऊ असे आमिष दाखवले जात होते. त्यासाठी नागरिकांकडून सविस्तर वैयक्तिक माहिती घेतली जात आणि ती त्रयस्थ संस्थांना विकून आर्थिक फायदा मिळवला जात होता.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण नाळे आणि गुन्हे शाखा युनिट–२ चे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने छापा टाकून दोन्ही कॉल सेंटरमधील कृत्यांना आळा घातला. या प्रकरणी टेकला सोल्युशनचे मालक धनंजय साहेबराव कासार, मॅनेजर हर्षद शंकर खामकर तसेच स्काय सोल्युशनचे मालक सागर कुमार यादव आणि मॅनेजर आनंद पंकज सिन्हा यांना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांचा वाढता चेहरा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील फसवणुकीचे हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे मानले जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Title: Cyber police 4 arrest gave loan to foreigner people pimpri crime news