आधीच तणाव अन् आता भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला पाकिस्तान; लोकं झोपेत असतानाच... (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून भारतावर हल्ला केला जात आहे. असे असताना भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच पाकिस्तानच्या अडचणी थांबता थांबत नसल्याचे दिसून आले. कारण, पाकिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानमध्ये आज पहाटे 1.44 वाजता (IST) भूकंप झाला. या भूंकपाची तीव्रता 4.0 इतकी नोंदवली गेली.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ही माहिती दिली आहे. भूकंपाचे केंद्र पश्चिम पाकिस्तानमधील क्वेट्टाजवळ होते. याआधी सोमवारीही पाकिस्तानमध्ये 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) सांगितले की, भूकंप सायंकाळी 4.05 वाजता झाला. भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीमुळे लोक घराबाहेर पडले. एनसीएसच्या मते, भूकंपाचे केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होते, अक्षांश 36.60 उत्तर आणि रेखांश 72.89 पूर्व होते.
मध्यरात्री झाला भूकंप
भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानमध्ये 9 मे रोजी रात्री उशिरा अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4 इतकी नोंदवली जात आहे. एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे की भूकंप रात्री उशिरा 1.44 वाजता झाला.
बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहराजवळ भूकंपाचे धक्के
भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली आहे की नाही हे अद्याप कळलेले नाही. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा शहराजवळ भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.
भूकंप का होतात?
अलिकडच्या काळात, देश आणि जगाच्या अनेक भागात भूकंपांच्या घटनांमध्ये वाढ दिसून आली आहे. आपल्या पृथ्वीच्या आत 7 टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स त्यांच्या जागी सतत फिरत असतात. तथापि, कधीकधी टक्कर किंवा घर्षण होते. या कारणास्तव, पृथ्वीवर भूकंपाच्या घटना घडतात. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. भूकंपामुळे घरे कोसळतात आणि हजारो लोक ढिगाऱ्याखाली दबून मृत्युमुखी पडतात.