'हॉर्मुझची सामुद्रधुनी' आधीपासूनच बंद; आता भारतावर येणार 'हे' नवे संकट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रियाध : अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जगातील प्रमुख जलमार्ग मानला जाणारा ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ आधीपासूनच बंद होता. आता सौदी अरेबियाने आपली ‘ईस्ट-वेस्ट पाईपलाईन’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून सौदी हॉर्मुझचा मार्ग टाळून आपले कच्चे तेल पश्चिमेकडील ‘यनबू’ बंदरापर्यंत पोहोचवत होता, जिथून ते भारत आणि आशियातील इतर देशांमध्ये पाठवले जात होते. मात्र, या पाईपलाईनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर ती तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
या पाईपलाईनच्या बंद पडण्याने भारतासह आशियातील अनेक देशांच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळे हॉर्मुझ मार्ग बंद झाल्यानंतर सौदी अरेबिया याच पाईपलाईनद्वारे दररोज सुमारे ५० लाख बॅरल तेल यनबू बंदरात पाठवत होता, जिथून जहाजांद्वारे ते इतर देशांपर्यंत पोहोचवले जात होते. अमेरिका-इराण युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील कच्च्या तेलाचे उत्पादन ३६ वर्षांतील सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचले आहे.
China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात त्यांच्या निर्यातीतही ४० टक्क्यांची घट झाली आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकर्सची वाहतूक जवळजवळ ठप्प झाली आहे. अशा स्थितीत सौदी अरेबियाने आपल्या तेल निर्यातीसाठी १२०० किलोमीटर लांबीच्या ईस्ट-वेस्ट पाईपलाईनचा आधार घेतला होता; परंतु आता या पर्यायी मार्गावरही संकट उभे राहिले आहे. सौदीच्या ऊर्जा मंत्रालयानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून ही पाईपलाईन बंद करण्यात आली आहे.
बाब अल-मंदेबही धोक्यात
यमनमध्ये इराणचे समर्थन असलेल्या ‘हुती’ विद्रोहींनी तांबड्या समुद्रातील धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे बंदर असलेल्या ‘मोखा’ शहरावर ताबा मिळवला आहे. हे शहर’ बाब अल-मंदेब’ या जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गापासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर आहे. मोखा शहरावर यापूर्वी यमनी नॅशनल रेझिस्टन्स फोर्सचे नियंत्रण होते, जे हुतीविरोधात लढणारे सौदी समर्थित गट आहेत.
भारताची चिंता वाढली
भारत आपल्या गरजेचा मोठा भाग कच्च्या तेलाच्या आयतीद्वारे पूर्ण करतो. अशा स्थितीत जगातील कोणत्याही मोठ्या तेल उत्पादक देशाच्या पुरवठा किंवा शिपिंग व्यवस्थेत अडथळा निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होतो. सौदी अरेबिया हा भारताच्या प्रमुख तेल पुरवठादारांपैकी एक आहे. आता ही पाईपलाईन दीर्घकाळ बंद राहिली आणि यनबू बंदराद्वारे आशियात जाणारा पुरवठा बाधित झाला, तर भारतासह आशियाई ग्राहकांना इतर स्रोतांकडून किंवा लांबच्या सागरी मार्गाने तेल आयात करावे लागेल.






