File Photo : Virus
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे चीनसह जगभरात मोठा हाहाकार उडाला होता. चीनमधून उगम पावलेल्या कोरोना लाटेमुळे झालेला विध्वंस जगाने पाहिला आहे. कोरोनाने केवळ चीनमध्येच नाही तर जगभरात हाहाकार माजवला होता. चीनच्या वुहान शहरातील कोरोनाचे रहस्य आजही कायम आहे. असे असताना आता चीनमध्येच श्वसनाच्या आजारांच्या वाढत्या घटनांमुळे भारतातही चिंता वाढली आहे. चीनमध्ये HMPV हा व्हायरस थैमान घालत आहे.
हेदेखील वाचा : कोरोनानंतर आता आणखी एका महामारीने काढले डोके वर; चीनमध्ये ‘त्या’ व्हायरसने माजवला हाहाकार
चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकार सर्व उपलब्ध माध्यमांद्वारे परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे आणि WHO ला देखील वेळेवर माहिती सामायिक करण्याची विनंती करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. तसेच श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये होणाऱ्या कोणत्याही वाढीला तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे तयार असल्याचेही सांगितले.
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून, HMPV प्रकरणांची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाईल आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) वर्षभर HMPV ट्रेंडचे निरीक्षण करेल. चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही विषाणूची भारताने भीती बाळगण्याची गरज नाही, आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असेही म्हटले आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शनिवारी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची (जेएमजी) बैठक झाली.
सरकारचे बारकाईने लक्ष
सरकार सर्व उपलब्ध माध्यमांद्वारे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि WHO ला देखील चीनमधील परिस्थितीबाबत वेळेवर डेटा शेअर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
चीनमधील परिस्थिती असामान्य नाही
मंत्रालयाने सांगितले की, सविस्तर चर्चा केल्यानंतर आणि सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे, हे मान्य करण्यात आले की सध्या चालू असलेल्या फ्लूची स्थिती पाहता चीनमधील परिस्थिती असामान्य नाही. श्वसन आजारांमध्ये सध्याची वाढ इन्फ्लूएंझा व्हायरस, आरएसव्ही आणि एचएमपीव्हीमुळे होत आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती?
चीन सध्या मानवी मेटापन्यूमोव्हायरसने पूर्णपणे उद्ध्वस्त होताना दिसत आहे. HMPV मध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसतात. त्याची लक्षणे देखील कोविड-19 सारखीच आहेत. सध्या चीन या परिस्थितीकडेही लक्ष ठेऊन आहे.