Iran-US War : आणखी फटका बसणार; होर्मुज स्ट्रेटमध्ये जहाजांवर इराण लादू शकतो शुल्क ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
तेहरान : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या देशांकडून हल्ले केले जात आहेत. त्याला इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या देशांतील तणाव वाढताना दिसत आहे. असे असताना आता या संघर्षाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर शुल्क आकारू शकतो, असे म्हटले जात आहे.
सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर नवीन नियम लागू करू शकतात. यामध्ये जहाजांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी शुल्क आकारण्याच्या शक्यतेचा समावेश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सागरी मार्गाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रदेशात सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. इराण या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील निगराणी आणखी मजबूत करत आहे. भविष्यात या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांसाठी शुल्क प्रणाली लागू केली जाऊ शकते.
दरम्यान, पश्चिम आशियामध्ये एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य कराराबाबत सुरू असलेल्या चर्चेत इस्रायलचा कोणताही सहभाग नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा देश या वाटाघाटींचा भाग होणार नाही आणि कोणत्याही प्रस्तावित करारात सहभागी होणार नाही.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर देशाचे पूर्ण नियंत्रण
इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर देशाचे पूर्ण नियंत्रण आहे. त्यांनी स्पष्ट केले की, इराणच्या परवानगीशिवाय कोणत्याही जहाजाला या सामरिक सागरी मार्गात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
अमेरिकेसोबतच्या कराराबाबत अनिश्चितता कायम
इराणने हे देखील स्पष्ट केले आहे की, अमेरिकेसोबतच्या संभाव्य शांतता करारासाठी अद्याप कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, इराणच्या वाटाघाटी करणाऱ्या पथकाची पुढील काही दिवसांत जिनिव्हा किंवा इस्लामाबादला भेट देण्याची कोणतीही योजना नाही. करारावर स्वाक्षरी करण्याच्या नेमक्या तारखेची त्यांना वाट पाहावी लागेल.
शांतता करारावर स्वाक्षरीची गरज
अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करारावर रविवारी स्वाक्षरी होण्याची शक्यता कमी आहे. पुढील काही दिवसांत करार शक्य आहे, परंतु परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही. त्यांच्या मते, पाकिस्तानच्या मध्यस्थीने तयार होत असलेल्या कराराचा उद्देश युद्ध टाळणे हा आहे, परंतु त्यात सध्या अणुऊर्जा विषयाचा समावेश नाही.






