अमेरिका, इस्रायल पुन्हा करणार इराणवर हल्ला; इराणचे वीज, तेल शुद्धीकरण प्रकल्प 'टार्गेट'वर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्त्रायल इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहेत. या आठवड्यात वीज प्रकल्प आणि तेल शुद्धीकरण कारखाने लक्ष्य केले जाऊ शकतात. या लष्करी योजनेवर कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, ‘आम्ही इराणवर खूप मोठा हल्ला करू.’ त्यांचा आता इराणवर विश्वास राहिलेला नाही. कारण ‘ते खोटे बोलतात, चर्चेची भाषा करतात, पण वारंवार आपली आश्वासने मोडतात.’
एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, जर अमेरिकेने हल्ला केला, तर ते पूर्ण तयारीने प्रत्युत्तर देतील. त्यांच्या मते, प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि इस्रायलचे महत्त्वाचे लष्करी तळ आणि पायाभूत सुविधा लक्ष्य केल्या जातील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याचा मार्ग शोधत आहेत. सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांनी या आठवड्यात व्हाईट हाऊसला भेट देऊन ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना हा संदेश दिला की, युद्धाची तीव्रता लवकरात लवकर कमी केली पाहिजे, कारण दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात मोठे संकट निर्माण होऊ शकते.
कुवेत सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलेल
ड्रोन हल्ल्यानंतर कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचा तीव्र शब्दांत निषेध केला. कुवेतने म्हटले आहे की, आपली सुरक्षा, राष्ट्रीय हितसंबंध आणि संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार ते राखून ठेवतात. मंत्रालयाने म्हटले आहे की, महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करणे हे कुवेतच्या सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन आहे आणि ते इराणची आक्रमक भूमिका दर्शवते.
अमेरिकेशी कधीच समझोता नाही
इराण-अमेरिका युद्ध हे कधी संपेल हे कोणच सांगू शकत नाही. सुरवातीला इस्रायल आणि अमेरिकेने तीन दिवसात इराणला मारू आणि तिथली इस्लामिक राजवट मोडून काढू असे विधान जगासमोर केले होते. पण प्रत्यक्षात मात्र तीन दिवसांचे तीन महिने होत आले तरीही इराण अजून युद्धात उभा आहे. ४० वर्ष आणि त्याहून अधिकचा काळ इराणवर अमेरिकेने जागतिक आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणची अर्थ व्यवस्था डबघाईला आली आहे . इराणचे अंदाजे अंदाजे 100 ते 120 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी परदेशातील मालमत्ता अनेक वर्षे विविध स्वरूपात अडकली होती, असा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.






