Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन 'प्रतिबंधित क्षेत्र' घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
मध्यपूर्वेतील (आखातातील) तणाव आता एका अतिशय धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक शांतता चर्चा पूर्णपणे अयशस्वी ठरल्यानंतर, वॉशिंग्टनने तेहरानवर नवीन आर्थिक व लष्करी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) एक नवीन “प्रतिबंधित क्षेत्र” (Restricted Maritime Zone) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. इराणच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जगाला पुन्हा एकदा भीषण इंधन संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणच्या ‘सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे’ (SNSC) नवे प्रमुख मोहसेन रझाई यांनी इराणच्या सरकारी प्रसारकाशी बोलताना या अत्यंत संवेदनशील योजनेची माहिती दिली. रझाई यांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत या नवीन क्षेत्राची औपचारिक घोषणा केली जाईल. हे नवीन क्षेत्र अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदी रेषेपासून सुरू होऊन थेट होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत आणि तिथून पर्शियन आखाताच्या (Persian Gulf) आतपर्यंत विस्तारित असेल. या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या आणि ओळख पटलेल्या कोणत्याही परदेशी जहाजावर इराण थेट बंदी घालेल आणि त्यांना रोखले जाईल, असा स्पष्ट इशारा तेहरानने दिला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनी विकत आहेत आपले घर; लंडनमधील 460 कोटी रुपयांच्या फ्लॅट्ससाठी लिलाव सुरू
हा संपूर्ण वाद अमेरिकन युद्धनौका आणि इराणी तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांनंतर अधिक तीव्र झाला आहे. अमेरिकेने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत इराणच्या तीन मुख्य तेलवाहू जहाजांवर (Oil Tankers) हल्ला करून ती उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने अमेरिकेच्या एका युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हा दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष युद्धाचा एक अत्यंत धोकादायक टप्पा आहे. यापूर्वी इराण केवळ व्यापारी जहाजांना लक्ष्य करत असे, परंतु आता थेट लष्करी युद्धनौका आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mohan Bhagwat : ‘कर्मभूमीशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व’; लंडनमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य
दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने आखातामध्ये २५ हून अधिक युद्धनौका तैनात करून इराणच्या बंदरांची पूर्ण नाकेबंदी केली आहे. या नाकेबंदीचा मुख्य उद्देश इराणची तेल निर्यात पूर्णपणे रोखणे हा आहे. अमेरिकन नौदलाने आतापर्यंत ९० हून अधिक व्यापारी जहाजांचे मार्ग बदलले असून अनेक जहाजांना किनाऱ्यावरच थांबवून ठेवले आहे. दुसरीकडे, इराणने अमेरिकेचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केवळ आपलेच नियंत्रण असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
आखातातील या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसू शकतो, कारण जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के तेल वाहतूक एकट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. जर हा मार्ग इराणने पूर्णपणे बंद केला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडतील आणि महागाईचा भडका उडेल. सध्या दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून, येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.






