US-Iran War: इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिका आणि इराणमधील (US Iran war) तणावाने आतापर्यंतची सर्वात धोकादायक पातळी गाठली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले असून मध्य पूर्वेत एका भीषण महायुद्धाचे संकेत मिळत आहेत. इराण आपल्या गुप्त पर्वतीय बोगद्यांमध्ये वेगाने अणुबॉम्ब विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. या घाईगडबडीत सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय मानकांना बाजूला ठेवल्याने अत्यंत गंभीर अणु-अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. इराणच्या नव्या नेतृत्वाने आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्पने (IRGC) आपल्या नागरिकांना संभाव्य आपत्कालीन परिस्थिती आणि युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे, अमेरिकेने आखाती देशांमध्ये आपली लष्करी उपस्थिती कमालीची वाढवली आहे. पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीने सुसज्ज असलेली मालवाहू विमाने, अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि मरीन एक्सपेडिशनरी युनिट्स इराणच्या सीमेवळ तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर या प्रदेशातील लष्करी हालचालींना वेग आला आहे. इराणचे गुप्त अण्वस्त्र उपक्रम नष्ट करण्यासाठी अमेरिका कोणत्याही क्षणी मोठा लष्करी हल्ला करू शकते, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत सुरू आहे.
गुप्तचर अहवालानुसार, इराणच्या अत्यंत उंचावर असलेल्या पिकॅक्स (PICEX) पर्वतातील बोगद्यांमध्ये गूढ हालचाली सुरू आहेत. हे बोगदे जमिनीच्या शेकडो फूट खोल असून ते बंकर-बस्टर बॉम्बनेही भेदणे कठीण मानले जाते. इराण अण्वस्त्रसज्ज देश बनण्यासाठी वेगाने काम करत असून सुरक्षेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करत आहे. लष्करी तज्ज्ञांच्या मते, या निष्काळजीपणामुळे तीव्र किरणोत्सर्ग (Radiation) पसरण्याची किंवा मोठा स्फोट होण्याची भीती आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?
इराणमधील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. IRGC कडून देशातील जनतेला मानसिकदृष्ट्या अणुप्रलयासाठी तयार राहण्यास सांगितले जात आहे. जर अण्वस्त्र बनवण्याच्या प्रक्रियेत काही दुर्घटना घडली, तर इराण त्याचा दोष थेट अमेरिकन हल्ल्यावर ढकलण्याची योजना आखत असल्याचा संशयही पाश्चात्य माध्यमांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकन सैन्याने इराणवर अचूक आणि वेगवान हल्ले करण्यासाठी आपल्या सर्वात अत्याधुनिक F-35 स्टेल्थ लढाऊ विमानांचा ताफा सज्ज ठेवला आहे. ही विमाने रडारला चकमा देण्यात पटाईत आहेत. मात्र, इराणने याला उत्तर म्हणून ‘358’ नावाचे एक अनोखे आणि घातक क्षेपणास्त्र तैनात केले आहे. हे क्षेपणास्त्र पारंपरिक रडारवर अवलंबून न राहता ‘पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर्स’चा (Passive Infrared Sensors) वापर करते आणि विमानाच्या इंजिनमधून निघणाऱ्या उष्णतेचा (Thermal Signature) मागोवा घेते.
‘358’ क्षेपणास्त्र डागल्यानंतर सुमारे ६० मिनिटे हवेत घिरट्या घालू शकते, ज्यामुळे ते एका हवेतील ‘भूसुरुंगासारखे’ (Airborne Mine) काम करते. ६४० किमी प्रतितास वेगाने धावणारे हे क्षेपणास्त्र F-35 च्या रडारलाही अदृश्य राहते. अगदी शेवटच्या क्षणी वैमानिकाला याचा अंदाज येतो, ज्यामुळे बचाव करणे अत्यंत कठीण होते. हे क्षेपणास्त्र फुटल्यावर गोळीसारखे शेकडो छर्रे बाहेर फेकते, जे F-35 सारख्या मजबूत लढाऊ विमानाची ढाल सहज भेदून विनाश घडवू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms 2026 : अमेरिका मध्यावधी निवडणुकांपूर्वी मोठा सायबर हल्ला; फेडरल इलेक्शन कमिशनची फाइलिंग सिस्टीम हॅक झाल्याने खळबळ
जगातील ३०% हून अधिक तेल वाहतूक होणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. ऑक्टोबर महिन्यात या भागात २८ हून अधिक तेल टँकर्सवर हल्ले झाले असून, आखातात ११५ हून अधिक जहाजे अडकून पडली आहेत. इराणने या सागरी मार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याने जागतिक इंधन पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.
या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अमेरिकन मध्यवर्ती कमांडने (CENTCOM) आपल्या नौदल आणि मरीन कॉर्प्सच्या तुकड्यांना तीव्र सरावाचे आदेश दिले आहेत. अमेरिकन कमांडो बोगद्यांमध्ये घुसून युरेनियम जप्त करण्याच्या आणि हाताहाती लढाईच्या (Hand-to-Hand Combat) सरावात व्यस्त आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरद्वारे इराणी बेटांवर ताबा मिळवण्याचे मॉक-ड्रिल्स केले जात आहेत. ट्रम्प यांच्या मते, या संकटामुळे तात्पुरता त्रास झाला तरी इराणवर निर्णायक कारवाई केल्याशिवाय जागतिक तेल बाजार पूर्वपदावर येऊ शकत नाही.






