सौजन्य : Keir Starmer (X Account)
लंडन : ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून, या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले ऋषी सुनक यांचा पराभव होत असल्याचे दिसत आहे. तर कीर स्टार्मर यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. ‘एक्झिट पोल’नुसार, प्रमुख विरोधी पक्ष लेबर पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 14 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देशात लेबर पार्टीचे सरकार स्थापन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत लिबरल डेमोक्रॅट्सने 67 जागा जिंकल्या आहेत. तर स्कॉटिश नॅशनल पार्टीने सात जागा जिंकल्या आहेत आणि रिफॉर्म यूकेने चार जागा जिंकल्या आहेत. तर ग्रीन पार्टीला आतापर्यंत फक्त एक जागा जिंकता आली आहे. त्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना त्यांच्या पश्चिम नॉरफोकच्या जागेवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. ट्रस सप्टेंबर 2022 मध्ये पंतप्रधान झाल्या होत्या. मात्र, अवघ्या सहा आठवड्यांत त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केला असून, ‘मी माफी मागतो आणि या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. लेबर पार्टीने ही निवडणूक जिंकली आहे आणि मी कीर स्टार्मर यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फोन केला. आज शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सत्ता हस्तांतरण होईल’.
लेबर पार्टी देशसेवेसाठी कायम तत्पर
कीर स्टार्मर यांनी या विजयानंतर मीडियाला संबोधित करताना सांगितले की, ‘आम्ही ते करून दाखवलं. याचसाठी प्रचार केला होता, लढलो होतो. तुम्ही यासाठी मतदान केले आणि आता त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. आतापासूनच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. खरे सांगायचे तर हा बदललेला लेबर पार्टी आहे, जो देशसेवेसाठी तत्पर आहे’.