फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ब्रासिलिया: ब्राझीलमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्राझीच्या सर्वोच्च न्यायालाच्या बाहेर आत्मघाती हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने स्वत:हा स्फोटकांसह न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान हा हल्ला झाला अशी माहिती न्यायालातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, G-20 परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात सुरू होती याच दरम्यान हा हल्ला झाला. या अंतिम टप्प्यात जगातील 20 प्रमुख अर्थव्यवस्थेचे नेते सहभागी होणार होते.
एकामागोमाग दोन स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. या घटनेमुळे ब्राझीलच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिकच कठोर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ही घटना सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ घडली. न्यायालयाच्या इमारतीच्या पार्किंग परिसरात पहिला स्फोट झाला. त्यानंतर लगेच काही सेकंदांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या समोर दुसरा स्फोट झाला. तपासादरम्यान घटनास्थळावर मानवी अवशेष सापडले असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेचा तपास सुरू
या स्फोटाने ब्राझिलियाच्या प्लाझा ऑफ थ्री पॉवर्स या प्रतिष्ठित चौकाच्या आसपास भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात फेडरल सरकारच्या तीन प्रमुख इमारती आहेत. तसेच संशयित आरोपीचा न्यायालयाच्या इमारतीचे नुकसान करण्याचा हेतू असावा, असे मानले जात आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी बॉम्ब शोध पथक तैनात केले आहेत. घटनास्थळाचा सखोल तपास केला जात आहे. तर पोलिस मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.
या हल्ल्याच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायालच्या बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. फेडरल डिस्ट्रिक्टच्या व्हाईस गव्हर्नर सेलिना लिओ यांनी प्राथमिक तपासात असे सांगितले की, हल्लेखोराच्या कारमध्येही स्फोटकांचा साठा असावा. हल्लेखोर एकटा असावा, असे लिओ यांनी व्यक्त केले. मात्र, हल्ल्याची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट नाहीत. ब्राझीलसाठी हा हल्ला सुरक्षा व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा मानला जात आहे, विशेषत: आगामी जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर.
ब्राझील: G20 शिखर परिषदेत भारताचा सहभाग
पंतप्रधान मोदी 18-19 नोव्हेंबर रोजी रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी भारताने G20 परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते. यावेळी ब्राझील या परिषदेचे आयोजन करत आहे. या परिषदेत पंतप्रधान मोदी जागतिक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट करतील आणि G20 नवी दिल्ली नेत्यांच्या घोषणेचाही आढावा घेतील. या निमित्ताने ते विविध देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील, ज्यामुळे भारताचे जागतिक संबंध अधिक दृढ होतील.
हे देखील वाचा- Israel-Hamas War: इस्त्रायलचे गाझावर विनाशकारी हल्ले; 24 तासांत 46 जणांचा मृत्यू